नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरू झाली जंगल सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:10+5:302021-06-26T04:21:10+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऐन हंगामात बंद पडलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जिल्ह्यातील सुरळीत परिस्थिती बघता खुले करण्यास परवानगी ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऐन हंगामात बंद पडलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला जिल्ह्यातील सुरळीत परिस्थिती बघता खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारपासून (दि.२६) व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करता येणार आहे. मात्र येत्या ३० तारखेपर्यंतच व्याघ्र प्रकल्पाला परवानगी देण्यात आली असून यातही कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे राहणार आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. परिणामी मागील वर्षी वनपर्यटनाच्या मुख्य हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद करावे लागले होते. आता यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावा लागला. यामुळे यंदाही ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या राज्यात गोंदिया जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट सर्वांत कमी आहे. परिणामी शासनाने व्याघ्र प्रकल्पांना खुले करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारपासून (दि.२६) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होणार असून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, ही मजा फक्त येत्या ३० जूनपर्यंतच घेता येणार आहे. त्यातही कोरोना नियमांचे सक्तीने पालन करावयाचे आहे. आता मान्सून सुरू झाला असून जंगलात प्रवेशबंदी असते. त्यात आता ५ दिवसांची सूट मिळाली असल्याने तेवढा तरी दिलासा मिळाला असेच म्हणता येईल व पर्यंटकांना एक संधी यातून मिळाली आहे.
-------------------------------
या अटींचे पालन करणे बंधनकारक
व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या व्यक्तींची थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक राहील व प्रवेश देताना सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला मास्क लावावा लागणार आहे. वाहन क्षमतेच्या ५० टक्के एवढ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. जिप्सीत ४ व्यक्तींना तसेच एकाच कुटुंबातील असल्यास ६ व्यक्तींना (चालक व मार्गदर्शक वगळून) प्रवेश दिला जाईल. खासगी चारचाकी (लहान) वाहनांत २ पर्यटक तर मोठ्या वाहनांत ४ पर्यटकांनाच (चालक-मार्गदर्शन वगळून) प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय वनविभागाने घातलेल्या अटींचा काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.