जंगल सफारीचा मोह वाढला
By admin | Published: June 6, 2016 02:36 AM2016-06-06T02:36:35+5:302016-06-06T02:36:35+5:30
जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी
कपिल केकत ल्ल गोंदिया
जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉंक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या दुपटीने जास्त आहे. यातून जंगल सफारीचा मोह वाढत चालल्याने दिसून येते.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे. विशेष म्हणजे वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर ख्याती आहे.
व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट- कॉंक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने पाहुण्यांचीही घरी गर्दी असून त्यांनाही सुट्टीचा आनंद लाभावा या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नागरिक जंगल सफारीला पसंती देत आहेत. त्यात उन्हाळ््याचे तीन महिने जंगल सफारीसाठी अनुकूल असतात व वाघोबांचे दर्शनही होते. हेच कारण आहे की सध्या व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे.
येथे विशेष बाब म्हणजे, यंदाच्या मार्च व एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत जास्त पर्यटकांची नोंद घेण्यात आली आहे. यात मागील वर्षी सन २०१५ च्या मार्च महिन्यात एक हजार ७३४ पर्यटकांची तर एप्रिल महिन्यात दोन हजार ४५७ पर्यटकांची अशी एकूण चार हजार १९१ पर्यटकांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८५ हजार ६४० रूपये पर्यटक शुल्क, एक लाख १७ हजार ८५० रूपये वाहन भाडे व ४४ हजार रूपये कॅमेरा शुल्क वनविभागाला प्राप्त झाले आहे.
यात यंदा चांगलीच भर पडली असून यंदा सन २०१६ मध्ये मार्च महिन्यात चार हजार ९०१ पर्यटक व एप्रिल महिन्यात चार हजार ५४१ असे एकूण नऊ हजार ४४२ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. यात त्यांच्याकडून चार लाख ३७ हजार ७२० रूपये पर्यटक शुल्क, दोन लाख ७७ हजार ८०० रूपये वाहन भाडे तर ६७ हजार ९०० रूपये कॅमेरा शुल्क वनविभागाला प्राप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे वरील आकडेवारी बघता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीने पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसून येते. यामुळे व विभागाचाही चांगलाच आर्थिक फायदा होत आहे. एकंदर नागरिकांचा जंगल सफारीचा मोह वाढू लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पिटेझरी गेटवरून सर्वाधिक प्रवेश
व्याघ्र प्रकल्पासाठी असलेल्या गेटमधील पिटेझरी गेटवरून सध्या सर्वाधीक पर्यटक प्रवेश घेत असल्याचे कळले. याचे कारण असे की, पिटेझरी गेट राष्ट्रीय महामार्गावर असून पर्यटकांच्या माहितीसाठी अधिक सहज आहे. त्यानंतर चोरखमारा गेटवरून पर्यटक प्रवेश घेत आहेत.
१५ जूनपासून प्रकल्प होणार बंद
येत्या १५ तारखेपासून व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहे. पावसाळ््याच्या काळात दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर या काळात प्रकल्प बंद केले जातात. असे असतानाही अद्याप पर्यटकांची प्रवेशासाठी धडपड सुरूच आहे. प्रकल्प बंद व्हायला तसेच शाळा सुरू होण्यास जेमतेम काहीच दिवस उरल्याने पर्यटक रिझर्व्हेशनची स्थिती जाणून घेण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात विचारपूस करताना दिसून येत आहेत.