अंशकालीन बेरोजगार कर्मचाऱ्यांची थट्टा
By admin | Published: July 1, 2014 01:35 AM2014-07-01T01:35:02+5:302014-07-01T01:35:02+5:30
चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.
गोंदिया : चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.
अंशकालीन कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी अनेकवेळा उपोषण, धरणे-आंदोलन केले आहेत. परंतु सरकारकडून आश्वासनाशिवाय पदरात काही दिले नाही. याचाच परिणाम म्हणजे काहींचा मृत्यूही झाला. तिरोडा तालुक्यातील कटरे, सालेकसा येथील पारस नागपुरे, गोरेगाव येथील बाबुलाल पटले हे नोकरीची आशा करीत राहिले व मरणाधीन झाले. परंतु नोकरी मिळू शकली नाही.
पदवीधर अंशकालीन कर्मचारी डीएड, बीएड, एमए, एमएड, टंकलेखक, डीफॉर्म असून त्यांच्याकडे ती वर्षे काम केल्याचे अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक विभागात ते जबाबदारीने काम करु शकतात. परंतु याची दखल कोणीही घेतली नाही. राज्य सरकारने सन २००४ व २००६ मध्ये नोकऱ्यांमध्ये त्यांना समाविष्ठ करण्याचे परिपत्रक काढले. न्यायालयानेसुद्धा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. परंतु वाट पाहता-पाहता त्यांनी वयोमर्यादा ओलांडली असून अंशकालीन कर्मचारी आजच्या घडीला हलाखीचे जीवन जगत आहे. आजही अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचारी बेरोजगार आहेत. वयोमर्यादा ओलांडलेले काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह करीत आहेत. आजच्या काळात ते प्रपंचाचा व मुलांच्या शिक्षणाचा भार सहन करु शकत नाही. तरी शासनाने या अंशकालीन बेरोजगांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावे, असे आवाहन संघटनेचे प्रांतीय सचिव व्ही.एम. चौरे यांनी एका निवेदनाद्वारे राज्यसरकारला केले आहे. (वार्ताहर)