वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा

By admin | Published: April 13, 2016 02:04 AM2016-04-13T02:04:59+5:302016-04-13T02:04:59+5:30

भूतप्रेत, जादूटोना, देवी अंगात येणे या बाबी फोल असून जगात चमत्कार नावाची गोष्टच नाही.

Jupasa scientific approach | वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा

Next

श्याम मानव : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह
गोंदिया : भूतप्रेत, जादूटोना, देवी अंगात येणे या बाबी फोल असून जगात चमत्कार नावाची गोष्टच नाही. चमत्कार कुठेही घडत असेल तर ते वास्तविक चमत्कार नसून त्यामागील खरे कारण काय हे शोधावे. चमत्काराच्या नावाखाली अनेक भोंदूबाबा लोकांची लुबाडणूक करतात. ही लुबाडणूक होवू नये व लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा संमत केला, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदिया व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सामाजिक सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचार व जादुटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन प्रा. श्याम मानव यांच्या हस्ते, डॉ. वीरेंद्र जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा. श्याम मानव पुढे म्हणाले, मला प्राध्यापक बनण्यात रस होता. कारण ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांचे चांगले जीवन घडवावे, असे वाटत होते. परंतु मी अपघाताने पत्रकार झालो. १५ वर्षे पत्रकारिता केली. तीन वर्षे प्राध्यापकाची नोकरी केली. पुणे येथे दोन वर्षे प्राध्यापक असताना बुद्धिप्रामाण्यवादाचा चांगलाच अनुभव घेतला. किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरी करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वीर सावरकर यांच्या साहित्यांचे अध्ययन करण्याची संधी मिळाली. साप्ताहिकांचाही अनुभव घेतला. या सर्व अध्ययनामुळे मी पार बदलून गेलो. अंधश्रद्धा व चमत्कार यांचे जगात अस्तित्वच नसून लोकांना लुबाडण्यासाठी आबा-बाबा असे कृत्य दाखवितात, असा पक्का समज झाला. त्यानंतर आम्ही बाबागिरीचे आॅपरेशन्स करायला सुरूवात केली व त्या बरोबरच समाजजागृती करण्याचे व्रतही अंगिकारले.
यानंतर त्यांनी जादुटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, थोडक्यात या कायद्याला जादुटोणाविरोधी कायदा म्हटले जाते. हा कायदा प्रथम १६ डिसेंबर २००५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पारित झाला. २६ आॅगस्ट २०१३ रोजी या कायद्याचा अध्यादेश निघाला. १३ डिसेंबर २०१३ रोजी विधानसभेत व २० डिसेंबर २०१३ रोजी विधान परिषदेत संमत होवून या अध्यादेशाचे रूपांतर कायम कायद्यात झाले.
या अधिनियमास महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ असे म्हणतात. अंधश्रद्धेने फसवणूक करून कुणी लोकांची लुबाडणूक करीत असेल तर तो गुन्हा ठरतो. दोष सिद्ध झाल्यावर सहा महिने कारावास व पाच हजार रूपये दंड ते सात वर्षे कारावास व ५० हजार रूपये दंड ठोठावला जातो. अंधश्रद्धेचा प्रचार-प्रसार करणे व त्यासाठी सहकार्य करणारेसुद्धा या कायद्यान्वये गुन्हेगार ठरतात. भूत उतरविण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीला शारीरिक त्रास देणे आदी अनेक बाबी दंडनिय असल्याचे सांगून त्यांनी जगात पसरलेला बौद्ध धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म यातील फरक स्पष्ट केला. बाबासाहेबांचा मार्ग अंधश्रद्धाविरोधी, विज्ञानाधिष्ठित व मानविय असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. जि.प. चे पशुसंवर्धन अधिकारी चव्हाण यांनी पशुसंवर्धनाबाबत योजनांची माहिती दिली. कृषी विभाग, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, विविध महामंडळातील योजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
प्रास्ताविक समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी, संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Jupasa scientific approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.