१५ दिवसांपासून बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:19 AM2017-07-24T00:19:32+5:302017-07-24T00:19:32+5:30
तिरोडा तालुक्यातील तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा या १८ किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली
विद्यार्थ्यांचे नुकसान : तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा रस्त्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा या १८ किमी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. तर मागील १५ दिवसांपासून एसटी महामंडळाची बससुद्धा या मार्गावरून बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या परिसरात चार ते पाच रेती घाट असून याच मार्गाने मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असते. अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याच पावसाचे पाणी साचते व रस्त्यावर चिखल पसरतो. जिल्हा परिषदेमध्ये या रस्त्याची नोंद जिल्ह्यातील सर्वाधिक खराब रस्ता, अशी झाली आहे.
रेती घाटांमुळे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकांची वाहतूक या रस्ताने होते. ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना सीडी वर्क व सायडींगला मातीकाम केल्यामुळे रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून तुमसर-घाटकुरोडा-तिरोडा बस बंद आहे. या रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे घाटकुरोडा, घोगरा, चांदोरी, मांडवी, बेलाटी येथील ग्रामस्थांना फटका बसला आहे. रस्त्याचे काम योगरित्या व सुरळीत करण्यात आले नाही तर जि.प. सदस्य मनोज डोंगरे व सरपंच स्वाती चौधरी यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा चर्चा करण्यात आली. तरीही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.
लोकप्रतिनिधी
करणार आंदोलन
रेती घाटांवरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे तिरोडा-घाटकुरोडा-देव्हाडा रस्त्याची दुरवस्था दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे मजबूत व सुरळीत बांधकाम करण्यात आले नाही तर जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे व कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व सरपंच तसेच सदस्य यांच्यासह आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.