शेवटच्या घटकापर्यंत न्याय दानाचे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:20+5:30
नव्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गोंदियातील जुन्या वकीलांच्या कामाची आठवण आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा विशेष उल्लेख करीत या विस्तारीत इमारतीचे उदघाटन आपल्या हातून होत असल्याबद्दल अत्याधिक आनंद झाल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदियाशी माझा जवळचा संबध आहे. सन १९९७ मध्ये मी गोंदियाला आलो असताना गोंदियाची परिस्थिती मला माहिती होती. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्या प्रयत्नाने गोंदियात न्यायालयाची सुसज्ज इमारत तयार करण्यात आली. या इमारतीतून निश्चितपणे राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्याचे काम होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीच्या ई लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती नितीन बोरकर उपस्थित होते. मंचावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टेकचंद कटरे, जिल्हाधिकारी दीपक मीना, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, कार्यकारी अभियंता व्ही.डी.देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, न्यायाधिश उपस्थित होते. सुरुवातीला नव्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गोंदियातील जुन्या वकीलांच्या कामाची आठवण आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा विशेष उल्लेख करीत या विस्तारीत इमारतीचे उदघाटन आपल्या हातून होत असल्याबद्दल अत्याधिक आनंद झाल्याचे सांगितले. गोंदिया येथूनच माझ्या वकीलीला सुरवात झाली. आज गोंदिया न्यायालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण होत आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. मी १९९५ मध्ये जेव्हा वकीली येथे सुरु केली तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी असून आज वकीलासांठी स्वतंत्र कक्ष व इतर सोयीसुविधा उपलब्ध झाल्या हे महत्वाचे असल्याचे विचार गोंदिया निवासी असलेले मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी व्यक्त केले. गोंदिया जिल्हा न्यायालयाचे जिल्हा पालक न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर म्हणाले की जिल्हा न्यायालयासाठी १० एकर जागेची गरज होती, परंतु शहरालगत एवढी शासकीय जागा उपलब्ध नव्हती आणि शहराबाहेर न्यायालय हलविणे सुद्दा तेवढे कठीण होते. त्याच काळात तत्कालीन जिल्हाधिकारी अमीत सैनी यांनी न्यायालय परिसराची पाहणी केली आणि पाहणीनंतर आपल्या कक्षात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यासोबंत बैठक घेत शेजारील जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.त्यावेळी मात्र गोंदियातील काही नेत्यांनी ती जागा देण्यास विरोध केल्याने बार कौन्सीलची मदत घेत न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. नागपूर खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषणकुमार गवई यांनी लक्ष घालून ती जागा न्यायालयासाठी देण्याचे आदेश पारीत करीत जिल्हा सत्र न्यायालय बांधकामाचा मार्ग मोकळा केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य जिल्हा व सत्र न्यायधीश सुहास माने यांंनी मांडले. संचालन न्यायाधीश वासंती मालोदे व वानखेडे यांनी केले तर आभार जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पराते यांनी मानले. कार्यक्र माची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.