राष्ट्रपतींच्या भेटीने भारावला कबीर
By admin | Published: June 23, 2017 01:16 AM2017-06-23T01:16:30+5:302017-06-23T01:16:30+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातून सहभागी झालेल्या तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांपैकी
दिल्लीची हवाई सफर : उपराष्ट्रपतींचीसुद्धा घेतली विद्यार्थ्यांनी भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातून सहभागी झालेल्या तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा हवाई सफर पुरस्कारासाठी क्रमांक लागला. गोंदियाच्या विवेक मंदिर हायस्कूलचा विद्यार्थी कबीर गजानन दियेवार असे त्याचे नाव आहे. दिल्ली येथील हवाई सफर करून परत आल्यावर तो लोकमतशी संवाद साधताना बोलत होता.
अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती. सर्व आपापले प्रश्न व समस्यांचा भडीमार करीत होते. कोणी दुष्काळाच्या उपाययोजनांचे समाधान तर कोणी वेगळ्या जिल्हा निर्मितीचा सूर आवळत होते. सर्वांना सर्मपक उत्तरेही मिळत होती. एका विशिष्ट जिल्ह्यातून आपण येथे आलेलो आहोत, अशा भावनेने अंगात उत्साह संचारला व आनंद द्विगुणीत झाला, असे कबीर दियेवार बोलताना सांगत होता.
लोकमत वृत्तपत्र समुहातर्फे ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर कबीरने या प्रवासाचे सारे वर्णन कथन केले. विदर्भातील जिल्ह्यातील संस्काराचे मोती स्पर्धेतील विजेते बुधवारी सकाळी नागपूर येथील विमानतळावरून अभूतपूर्व प्रवासाला निघाले. सर्वांचाच हा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह होता. प्रथम हवाई प्रवास असतानासुध्दा उत्साहामुळे कोणाच्याही मनात भीती जाणवत नव्हती. जवळपास दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्यदिव्य रूप पाहून सर्वच विद्यार्थी भारावून गेले. त्यानंतर काही वेळातच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली.
त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली भेटीच्या विलक्षण प्रवासाला सुरूवात झाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी रेल्वे संग्रहालयाला भेट दिली. तेथे त्यांना भारतीय रेल्वेच्या प्रारंभापासून वर्तमानापर्यंत रेल्वेने केलेल्या प्रगतीची एकूणच माहिती मिळाली. त्याचबरोबर भविष्यातील इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी सफदरजंग मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी स्मृती भवनालासुद्धा भेट दिली. तेथे स्व. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू संग्रहित आहेत. स्व. इंदिरा गांधी यांची हत्या झालेले स्थळही तेथे पहायला मिळाले.
या सर्व प्रेरणादायी व भावूक प्रसंगाने सर्व विद्यार्थी भारावून गेले.
प्रवासात पुढे महात्मा गांधी स्मृतिभवनाला भेट दिली. तेथे गांधीजींच्या जीवनातील संग्रहित वस्तूंचे दर्शन घेतले व गांधीजींच्या जीवनाविषयी अधिकची माहिती जाणून घेतली.
यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मीयतेने उत्तरे दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी इंडिया गेटला भेट दिली. तेथील सौंदर्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
त्यानंतर उपराष्ट्रपती मो. हमीद अंसारी यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी विद्यार्थ्यांना तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे, याबाबत विचारणा केली. यावर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार समर्पक उत्तरे दिलीत.यानंतर परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरच्या आकाशात घिरट्या घालू लागले. नागपूरच्या दिशेने उडाण करीत सुखरूप पोहोचले, असे कबीरने सांगितले. लोकमत समूहातर्फेकबीरला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे. लोकमतच्या उपक्रमामुळे त्याला अभूतपूर्व प्रवास करण्याची संधी मिळाली, असे उद्गार कबीरच्या कुटुंबीयांनी काढले. (प्रतिनिधी)