कचारगडला घडणार गोंडी धर्म कला संस्कृतीचे दर्शन; माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:26 PM2023-02-02T12:26:02+5:302023-02-02T12:37:21+5:30

देशभरातील गोंड जनजातीय समाजाची मांदियाळी

Kachargad Koyapunem jatra festival on Magh Purnima from 3 to 8 feb | कचारगडला घडणार गोंडी धर्म कला संस्कृतीचे दर्शन; माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव

कचारगडला घडणार गोंडी धर्म कला संस्कृतीचे दर्शन; माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव

Next

विजय मानकर

सालेकसा (गडचिरोली) : आदिवासी गोंड समाजाचे आद्यदैवत असलेले प्रसिद्ध स्थळ कचारगड येथे माघ पौर्णिमेला कोया पुनेम महोत्सव पाच दिवस चालणारा आहे. यादरम्यान देशभरातील आदिवासी समाजाचे लोक आपल्या कुलदैवतांना स्मरण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून कचारगड येथे दाखल होणार आहेत. दरवर्षी माघ पौर्णिमेला पाच दिवस गोंडी धर्म परंपरा, बोलीभाषा, पूजन-विधी, नृत्य-कला, रीतिरिवाज, कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या धार्मिक विधी व उत्सवाला कचारगड यात्रा असे नाव देण्यात आले असून, यात्रेदरम्यान पाच दिवस सतत विविधरंगी महोत्सव साजरे केले जातात.

गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किलोमीटर अंतरावर सालेकसा तालुक्यातील दरेकसापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्याच्या टोकावरील पर्वत रांगेत असलेल्या विशाल काय गुफेत कचारगड येथे आदिवासी गोंड समाजाची कुलदैवतांचे निवासी स्थान मानले जाते. गोंडी संस्कृतीचे अभ्यासक, साहित्यकारांच्या मतानुसार व गोंड समाजाच्या आख्यायिकेनुसार जवळपास साडेतीन हजार वर्षांपूर्वी माता गौराचे एकूण ३३ पुत्र उपद्रव करीत असल्यामुळे त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवण्यात आले होते व गुफेच्या तोंडावर मोठे दगड लावून बंद करण्यात आले होते. त्यांची वेदना सहन होत नसल्याने त्यावेळचे आद्य संगीतकार हिरासुका पाटालीर यांनी आपली किंदरी वाद्य संगीताच्या स्वरांनी त्या ३३ बंधूंच्या अंगात उत्साह संचारला. त्या सगळ्यांनी मिळून दगडाला धक्का दिला आणि तेथून पसार झाले. मात्र संगीतकार हिरा सुका पाटालीर त्या दगडाखाली दबून मृत्यू पावला.

३३ बंधूंनी देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणात जाऊन आपला वंशावळ केला नंतर त्यांच्या एकूण ७५० जाती निर्माण झाल्या आणि ह्या सगळ्या जाती दरवर्षी माग पौर्णिमेला आपल्या पूर्वजांना स्मरण तसेच गोंडी रचनाकार पहांदी पारी कोपार लिंगो आणि माता रायताड जंगो यांच्या पूजनासाठी कचारगडच्या गुफेत येत असतात. त्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या पूर्वजांची आत्मा अदृश्य वास्तव्य करीत आहे. म्हणून वर्षातून एकदा त्यांच्या अदृश्य दर्शनासाठी आल्यानंतर आपले आयुष्य धन्य होतो.

आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा

कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून, उंच पर्वत रांगा घनदाट जंगले आणि पुरेपूर ऑक्सिजन मिळणारे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कचारगडचा परिसर सतत लोकांना आकर्षित करीत असतो. त्यामुळे कचारगडला गोंड जनजाती समाजाच्या भाविकांसह मोठ्या प्रमाणावर पर्यटकसुद्धा कचारगड यात्रेत सहभागी होतात. कचारगडला जनसागर उसळलेला दिसून येतो.

१८ राज्यांतील समाजबांधवांची उपस्थिती

देशातील जवळपास १८ राज्यातील गोंडी भाविक बंधू-भगिनी आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी येथे येतात. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, उडिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रांतातील आदिवासी भाविकांची संख्या अधिक असते. या व्यतिरिक्त दिल्ली, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, कर्नाटक नागालँड, गुजरातसह जवळपास १८ राज्यातील गोंडी जनजाती भाविक मापौर्णिमेला आवर्जून येथे उपस्थित होतात.

Web Title: Kachargad Koyapunem jatra festival on Magh Purnima from 3 to 8 feb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.