कोरोना संकटामुळे कचारगड यात्रा झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:17+5:30

समस्त आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड आदिवासींचे उगमस्थान मानले जाते. आदिवासी गोंड समाजाच्या संशोधकांनी आणि धर्माचार्यांनी या स्थळाची ओळख पटल्यानंतर दरवर्षी माघ पौर्णिमेला कोया पुनेमची महापूजा व गोंडवाना महासंमेलन व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. १९८४ मध्ये गोंडी धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांच्या पुढाकाराने माघ पौर्णिमेला गोंडी ध्वज फडकावून व कोया पुनेमची महापूजा करुन कचारगड यात्रेची विधिवत सुरुवात केली.

Kachargad Yatra canceled due to Corona crisis | कोरोना संकटामुळे कचारगड यात्रा झाली रद्द

कोरोना संकटामुळे कचारगड यात्रा झाली रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे३६ वर्षांची परंपरा खंडित : पारंपरिक पूजा-अर्चना होणार

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : दरवर्षी माघ पौर्णिमेला पाच दिवस चालणारी कोया पुनेमची कचारगड यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मागील ३६ वर्षापासून अविरत चालणारी कचारगड यात्रेची परंपरा यंदा खंडित होणार आहे. मात्र २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आदिवासी भुमकाल (पुजारी) आणि धर्माचार्य आपल्या दैवतांची पूजा करू शकतील. यासाठी कोरोना नियम पाळावे लागणार आहेत. 
समस्त आदिवासी समाजबांधवाचे श्रद्धास्थान असलेले कचारगड आदिवासींचे उगमस्थान मानले जाते. आदिवासी गोंड समाजाच्या संशोधकांनी आणि धर्माचार्यांनी या स्थळाची ओळख पटल्यानंतर दरवर्षी माघ पौर्णिमेला कोया पुनेमची महापूजा व गोंडवाना महासंमेलन व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. १९८४ मध्ये गोंडी धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांच्या पुढाकाराने माघ पौर्णिमेला गोंडी ध्वज फडकावून व कोया पुनेमची महापूजा करुन कचारगड यात्रेची विधिवत सुरुवात केली. यावेळी आदिवासी भुमकाल धर्माचार्य आणि तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. ३६ वर्षापूर्वी फक्त सात लोकांच्या विशेष उपस्थितीमध्ये धनेगाव येथून सुरु झालेली कचारगड यात्रा मागील ३६ वर्षांत देशभरात प्रसिद्ध झाली. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी या स्थळी लाखोंंच्या संख्येने भाविक दरवर्षी येतात. मागील काही दिवसांपासून कचारगड यात्रेची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यात सुद्धा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशात लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमध्ये कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता कचारगड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

यात्रा रद्द करण्याचा निर्णय एकमताने
कचारगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर आणि वाढता कोरोना संक्रमणाचा संभावित धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय सालेकसा येथे आ. सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत तहसीलदार,बीडीओ, ठाणेदार व इतर अधिकारी आणि कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत सखोल चर्चा करुन कचारगड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाने कचारगड यात्रेला रद्द करण्याचा निर्णय दिला असला तरी कचारगड हे प्रमुख श्रद्धेचे स्थळ असून या ठिकाणी धर्माचार्याच्या हस्ते देवी देवतांची व कोया पुनेमची नैसर्गिक पूजा केली जाईल.यासाठी कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन पारंपरिक पूजा करण्यात येईल.
-दुर्गाप्रसाद कोकोडे, अध्यक्ष-कचारगड देवस्थान समिती धनेगाव
कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता कचारगड यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रमुख धर्माचार्यांनी पारंपरिक पूजा करावी. परंतु गर्दी वाढविणारे कुठलेही आयोजन समितीने करु नये.
- अरुण भुरे, तहसीलदार सालेकसा
कचारगड देवस्थान परिसर अतिसंवेदनशील असून या ठिकाणी आदिवासी भाविक आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी येतात. अशात यात्रा रद्द होत असताना कसलीही गर्दी वाढवू नये. तसेच पारंपरिक पूजा शांततेत पार पाडावी म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. धनेगाव ते कचारगडच्या गुफेपर्यंत १०० ते १५० जवान तत्पर ठेवण्यात येतील.
- प्रमोद बघेले, ठाणेदार सालेकसा

 

Web Title: Kachargad Yatra canceled due to Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.