कनेरीचा कायापालट करणार
By admin | Published: October 10, 2015 02:22 AM2015-10-10T02:22:04+5:302015-10-10T02:22:04+5:30
आमदार आदर्श ग्राम योजनेत या विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कनेरी गावाची निवड केली आहे.
पालकमंत्री बडोले : आमदार आदर्श ग्राम कनेरी येथे ग्रामसभा
गोंदिया : आमदार आदर्श ग्राम योजनेत या विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून कनेरी गावाची निवड केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची नियोजनातून प्रभावी अंमलबजावणी करून कनेरी गावाचा कायापालट करणार, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी गुरूवारी विशेष ग्रामसभेत ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत होते. सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी गाव पालकमंत्री बडोले यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले आहे.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जि.प. सदस्य माधुरी पाथोडे, शीला चव्हाण, पं.स. उपसभापती विजय शिवणकर, पं.स. सदस्य गिरीधर हत्तीमारे, सरपंच इंदू मेंढे, उपसरपंच प्रेमदास मेंढे, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक काझी, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, तालुका कृषी अधिकारी सुरेश पेशेट्टीवार, सहायक प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कनेरी ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा. प्रत्येक बालकाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षकांसह पालकांनी लक्ष द्यावे. सामाजिक एकोपा आणखी वृद्धिंगत झाला पाहिजे. गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृषीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. गावातील बेरोजगार युवक-युवतींना स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. कनेरीत पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. गावपरिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचे ग्रामस्थांनी जतन करावे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, सर्व यंत्रणांनी मिळून कनेरी गावाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणावयाचा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. गावाच्या भौतिक सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन एकत्र बसून गावाच्या विकासाबाबत काम करण्यात येईल. खासदार आदशर्् ग्राम योजनेच्या धर्तीवर ही योजना आहे.
कनेरी ग्रामस्थांचा एकोपा व विकासाची धडपड बघून पालकमंत्र्यांनी या गावाची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व हेवेदावे बाजूला सारून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे ते म्हणाले.
जि.प. सदस्य पाथोडे यांनी, आजही ग्रामीण भागाचा विकास झालेला नाही. विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना झाली पाहिजे. तरच त्या योजनांचा लाभ घेता येईल. महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक उपसरपंच प्रेमदास मेंढे यांनी केले. कोकणा-जमी येथील लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दांडिया सादर केले. संचालन ग्रामसेवक बिसेन यांनी केले. आभार ग्रामसेवक लंजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी झामरे, धारगावे, ग्रामसेविका सी.जे. बागडे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणार
कनेरी ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देऊ. गावाच्या विकासाचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करून व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे करण्यात येतील. शेतीपूरक व्यवसायांचे नियोजन करण्यात येईल. गावातील बचत गटातील महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करू. कनेरी येथील शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, असेही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.
आरोग्य विभागाने जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी
युवकांना कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने एक विशेष शिबिर घेवून त्यांची तपासणी करावी. गावातील कचऱ्यातून खतनिर्मिती करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करावा. गाव व्यवसमुक्त व्हावे याचा संकल्प गावातील प्रत्येक व्यक्तीने करावा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर ग्रामस्थांनी करू नये. जुन्या टाकावू साड्यांपासून बचत गटातील महिलांनी कापडी पिशव्या तयार कराव्या. सर्व यंत्रणा कनेरीत आदर्श काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.