कनेरी/राम शाळा जिल्ह्याची ‘आयकॉन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:11 PM2018-04-25T21:11:02+5:302018-04-25T21:11:02+5:30
आकाशात स्वच्छंद उडायचे असल्यास पंखाला बळ मिळाले की, क्षीतिजही कवेत घेता येते, याचाच प्रत्यय आला तो सडक/अर्जुनी तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कनेरी/राम येथे. येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत: कविता रचून ११६ पानांचा वार्षिक विशेषांक तयार केला.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आकाशात स्वच्छंद उडायचे असल्यास पंखाला बळ मिळाले की, क्षीतिजही कवेत घेता येते, याचाच प्रत्यय आला तो सडक/अर्जुनी तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कनेरी/राम येथे. येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत: कविता रचून ११६ पानांचा वार्षिक विशेषांक तयार केला. गुणवत्तेपासून व सर्व बाबींचे मूल्यांकन केल्यास जिल्ह्यात कनेरी/राम ही शाळा जिल्ह्याची ‘आयकॉन’ ठरते.
सडक-अर्जुनी तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कनेरी/राम या शाळेची स्थापना १९५६ ला झाली. परंतु या शाळेचा प्रवासे नोव्हेंबर २०१६ पासून सुरू झाला. डीआयईसीपीडी गोंदियाचे प्राचार्य राजकुमार हिवारे व त्यांच्या चमूने केलेल्या मार्गदर्शनामुळे मुख्याध्यापक एम.व्ही.येरणे, पी.बी.नेवारे, एम.जी.कोरे, एन.डी.गणवीर व व्ही.डी.गहाणे यांच्या प्रतिभेला बळ मिळाले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यात विविध मूल्ये रूजावित या उद्देशाने या शाळेतील शिक्षकांच्या कल्पनेतून अनेक शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्र म या शाळेत राबविले जात आहेत. कल्पनापूर्ण उपक्रम व लोकसहभागातून सन २०१६-१७ या सत्रात या गावची शाळा-आमची शाळा या अभिनव उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातून प्रोत्साहनपर प्रथम येण्याचा प्रवास नागरिकांच्या सहकार्याने व अधिकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे यशस्वी झाला. कनेरी/राम येथील गावकरी व शिक्षकांनी गोंदिया जिल्ह्यात एक आयकॉन निर्माण केला आहे.
कनेरी/राम ही ११४ विद्यार्थी व ५ शिक्षक असलेली शाळा आहे. विद्यार्थी स्वत: कविता,गोष्ट व वेगवेगळ्या विषयांवर लेख तयार करतात. नाट्यकरण, संभाषण व मुलाखत उत्तमरित्या सादरीकरण करतात. विद्यार्थी संचिकेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चित्रकला व कार्यानुभव या विषयावर सुंदर कलाकृती तयार केल्या आहेत.काव्यवाचन कट्यांंतर्गत विद्यार्थी वेगवेगळ्या कविता व मराठी गझला सादर करतात.गावकºयांना विश्वासात घेऊन त्यांच्याच मदतीने गावातून आजपर्यंत २ लाख रु पये जमा केले. शासनाकडून कुठलीच मदत न घेता स्वखर्चाने गावकरी दान म्हणून व शिक्षकांनी एक मॉडेल शाळा तयार केली.
घंटामुक्त शाळेत इंग्रजीतून परिपाठ
ही शाळा शनिवारी दप्तरविरहीत शाळा, बेलमुक्त शाळा आहे. शाळेच्या परिसरातील झाडांना वैज्ञानिक नावे देणे, सामान्य ज्ञानावर दैनिक हजेरी, उन्हाळी विद्यार्थी सार्वजनिक पाणपोई, शालेय परिसरात उन्हाळ्या पक्ष्यांसाठी पाणवट्याची सोय, शेवटच्या तासिकेला सामान्य ज्ञानावर पाच प्रश्न, विद्यार्थी सूचना तक्रार पेटी, आज माझा वाढदिवस, शालेय परसबाग, विद्यार्थी संचिका, संपूर्ण इंग्रजीतून परिपाठ, गावातील शिक्षण प्रेमींचे दैनिक अभ्यासिका वर्ग, विद्यार्थी रक्षाबंधन, वनराई बंधारा, वार्षिक स्नेहसंमेलन,पालक मेळावा आदी उपक्रम राबविले जातात.
राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक
-विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे म्हणून बचत बँक सुरू करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्र पासबुक आहे. आजपर्यंत बचत बँकेत २ लाखापेक्षा जास्त रक्कम जमा आहे. बँकेचे सर्व व्यवहार विद्यार्थी सांभाळतात.
स्वच्छतेविषयी स्पर्धा
-विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला जातो. शाळेतील सुंदर, स्वच्छ व निटनेटक्या दिसणाऱ्या एक मुलाला व एक मुलीला दररोज बॅचेस लावून त्यांना स्मार्ट बॉय, स्मार्ट गर्ल्स म्हणून निवडून विद्यार्थ्यांत स्वच्छतेविषयी स्पर्धा निर्माण केली जाते.
विद्यार्थ्यांचे शब्दांचे धन
-विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी व विकासात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो तो विद्यार्थी शाळेला वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट दिली जाते. ही पुस्तके वाचनालयात संग्रहित असतात. ती पुस्तके वाचायला विद्यार्थी घरी नेतात.