केटीएस, बीजीडब्ल्यूतील परिचारिका वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:09 PM2019-04-17T21:09:29+5:302019-04-17T21:10:10+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात सध्या कार्यरत परिचारिकांची नियुक्ती ही रत्नागिरी, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अकोला तसेच इतर जिल्ह्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे.
या परिचारिकांना जीएमसी वेतन पथक संबंधित बाबूकडून वेतन मंजूर करुन ते जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठविले जाते. मात्र कधी पीएनआर क्रमांक तर कधी कोषागार कार्यालयाकडून बिल न मिळाल्याचे कारण पुढे करुन वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे.
या दोन्ही रुग्णालयात कार्यरत ६० परिचारिकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा परिचारिकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
औषधे व यंत्रसामुग्रीची समस्या कायम
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध वितरण विभागात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचा तुटवडा आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्री, बीटी सेट, इंट्राकप, युरोबॅग, ग्लूकोजट्री आदी औषधी उपलब्ध नाही.तर ईसीजी, विष तपासणी, डेंग्यू-मलेरिया, सीबीसी, सिकसेल, थैलसिमीया, विड्राल, एचआयव्ही, केवायएफ, फ्लूड एक्सपर्ट यासारख्या तपासणीसाठी आवश्यक केमिकल उपलब्ध नसल्याने या तपासण्या बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन या तपासण्या करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयुर्वेदिक, आर्थोपेडिक, जनरल फिजीशियन, नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि दंतरोग तपासणी विभागात शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक विभागात ६ ते ७ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात २२आली आहे. मात्र तपासणीच्या वेळेस केवळ कनिष्ठ डॉक्टर उपलब्ध राहतात. त्यामुळे वरिष्ठ डॉक्टर नेमके जातात कुठे असा प्रश्न रुग्णांना पडतो.
सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. तसेच या परिसरात वित्त आणि लेखा विभागाचे कार्यालय आहे. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांची यंत्र सामुग्री भगवान भरोसे आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक वाहनांची सुध्दा चोरी झाली आहे. मात्र त्याची सुध्दा अद्याप दखल घेण्यात आली नाही.