मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार ठेवा बंद; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:58 PM2024-11-09T14:58:13+5:302024-11-09T14:59:34+5:30
Gondia : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार जिल्ह्यात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा याकरिता जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदारांचा सहभाग वाढविण्याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक दि. १९ नोव्हेंबर रोजी पोहोचणार असून, त्यांच्याजवळ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर सर्व संवेदनशील साहित्य राहणार आहे.
या साहित्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ क्रमांक २२ ची कलम ३७ (१) (३) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मात्र मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी आठवडी बाजार आयोजित करण्यात येत असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअर्थी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (अ) व (क) अंतर्गत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये त्यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.