नोकरी असेल प्यारी तर मोबाईलपासून ठेवा दुरी; महामंडळाच्या बसचालकांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 06:04 PM2023-11-20T18:04:13+5:302023-11-20T18:06:05+5:30

महामंडळाने बस चालकांसाठी काढलेले हे आदेश भंडारा विभागीय कार्यालयात धडकले आहेत.

keep it away from the mobile phone Instructions to Corporation Bus Drivers in gondia | नोकरी असेल प्यारी तर मोबाईलपासून ठेवा दुरी; महामंडळाच्या बसचालकांना सूचना 

नोकरी असेल प्यारी तर मोबाईलपासून ठेवा दुरी; महामंडळाच्या बसचालकांना सूचना 

गोंदिया : मोबाईलवर बोलत वाहन चालवित असलेल्या व्यक्तीला बघून अपघाताच्या भीतीने अंगावर काटा येतो. अशात प्रवाशांनी भरलेल्या बसचा चालक मोबाईलचा वापर करताना दिसून आल्यास मात्र प्रवाशांची काय स्थिती होणार याचा अंदाज लावता येतो. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस चालविताना मोबाईलवर बोलण्यास चालकांना मज्जाव केला आहे. मात्र, यानंतरही कुणी बस चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचे दिसल्यास त्याचा फोटाे काढून महामंडळाच्या कार्यालयात पाठविता येईल. यानंतर त्या चालकावर कठोर कारवाई केली जाणार आहे.


सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सर्वाधिक विश्वास करतात. मात्र, असे असतानाही महामंडळाचे चालक बस चालवित असताना भ्रमणध्वनीचा वापर करीत असल्याच्या घटना अलीकडील काळात निदर्शनास आल्या आहेत. चालक मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आल्यास बसमधील प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशात प्रवाशांकडून तक्रारी केल्या जातात. कित्येकदा प्रसार माध्यमांवर तसे व्हिडीओ प्रसारित करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. एवढेच नव्हे तर या प्रकाराला घेऊन लोकप्रतिनिधींनी सुद्धा तक्रार केली आहे. अशात प्रवाशांचा एसटीवरील विश्वास प्रबळ करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस चालवित असताना चालकांना मोबाईलचा वापर करण्यावर प्रतिबंध लावला आहे.


वाहकाकडे द्यावा लागणार मोबाईल - महामंडळाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे बसचालकाला आता बस चालवित असताना आपला मोबाईल वाहकाकडे द्यावा लागणार आहे. विनावाहक फेरीवरील चालकांना मोबाईल बस चालविताना आपल्या बॅगमध्ये ठेवावा लागणार आहे. बस चालवित असताना चालकाला हेडफोन व ब्लूटूथचा वापर करता येणार नाही. विशेष म्हणजे, सर्व तपासणी पथकांना दैनंदिन तपासणी कामगिरीत बसचालक बस चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचे, गाणे ऐकत असल्याचे, हेडफोन वा ब्लूटूथचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास तसा अहवाल सादर करावयाचा आहे. विभागास अहवाल प्राप्त होताच संबंधित चालकावर कारवाई केली जाणार आहे.


आजपासून होणार अंमलबजावणी-  महामंडळाने बस चालकांसाठी काढलेले हे आदेश सोमवारी (दि.२०) भंडारा विभागीय कार्यालयात धडकले आहेत. यामुळे या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. अशात आता एखादा बसचालक बस चालविताना मोबाईलवर बोलताना किंवा गाणे ऐकताना दिसून आल्यास मात्र त्याला हे चांगलेच महागात पडणार आहे.


घेणार चालकांची स्वाक्षरी- महामंडळाकडून काढण्यात आलेले आदेश प्राप्त होताच सर्व आगारांना सूचना देण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवायची असून, सूचना मिळाल्याबाबत चालकांची स्वाक्षरी घ्यायची आहे. एवढेच नव्हे तर आगारांमध्ये सूचना फलकांवर याबाबत वाहन चालकांसाठी सूचना प्रसारित करावयाची आहे.

Web Title: keep it away from the mobile phone Instructions to Corporation Bus Drivers in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.