पराभवाने न खचता सकारात्मक ध्येय ठेवा
By admin | Published: January 17, 2017 12:57 AM2017-01-17T00:57:42+5:302017-01-17T00:57:42+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते.
अतुल साळुंके : राज्यव्यापी रासेयो शिबिराची सांगता
बोंडगावदेवी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते. ग्रामीण जिवनाच्या सानिध्यातून स्नेहाचा झरा पाझरतो. समोर येणाऱ्या कठीण प्रसंगातील यशापयशची तमा बाळगू नये. पराभवाला न खचता सकारात्मक ध्येय ठेवून युवा वर्गाने बिनधास्त पुढे जावे असे मार्मिक प्रतिपादन मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतूल साळुंके यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एस.एस.जे.महाविद्यालयाच्यावतीने येथईल समाज मंदिरा आयोजीत सात दिवसीय राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष लुणकरण चितलंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊसाहेब बिडवे, डॉ. भाऊ दायदार, सरंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीदास बोरकर, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, तत्कालीन प्राचार्य वसंत पाटणकर, डॉ. वासुदेव भांडारकर, बद्रीप्रसाद जायस्वाल उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. साळुंके यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जिवनासोबत प्रत्यक्षात समरस होण्याची संधी मिळते. प्रत्येकाने आपल्या शांत स्वभावाने माणसे जोडण्याचे तंत्र अवगत करावे. समाजातील विधायक कार्य करण्यासाठी युवकांनी नि:संकोच पुढे यावे. कुटूंब व समाज एकत्र राहण्याची किमया अवगत केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. त्यामुळे उज्वल भविष्य समोर ठेवून युवकांनी मार्गक्रमण करावे. रासेयोच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्याची दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. बिडवे यांनी, पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी युवा वर्गाने पुढे यावे. तर दुधाळू जनावरांचे संगोपन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले.
डॉ.दायदार यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून गावात चैतन्याची लाट निर्माण होते.शिबिरार्थ्यांच्या श्रमशक्तीमधून गावाचा चेहरा-मोहरा बदलून कायापालट होण्यास मदत होते. गावातील विकास व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रासेयोच्या माध्यमातून झाला आहे. आता या पुढे गाव प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सामुहितपणे ग्रामस्थांची असल्याचे मत व्यक्त केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्तावीक शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी मांडले. अहवाल वाचन अभिजीत कुंभार यांनी केले. तर आभार डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)