उघड्यावरील धानाऐवजी गोदामातील धानाची केली उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:35+5:302021-07-05T04:18:35+5:30
देवरी : सर्व आदिवासी सहकारी संस्थेअंतर्गत उघड्यावर असलेले धान प्रथम उचल करा नंतर गोदामात असलेले धान उचल करण्यात यावे, ...
देवरी : सर्व आदिवासी सहकारी संस्थेअंतर्गत उघड्यावर असलेले धान प्रथम उचल करा नंतर गोदामात असलेले धान उचल करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडारा येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक यांनी नवेगावबांध उपप्रादेशिक कार्यालयामधील गोदामात ठेवलेले जवळपास ५० हजार क्विंटल धान राईस मिलर्सला उचलण्याचे आदेश दिल्याचा आरोप आदिवासी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या नवेगावबांध उपप्रादेशिक कार्यालय कनेरी, इळदा, गोठणगाव, केशोरी, बाराभाटी येथील गोदामामध्ये ठेवलेले जवळपास ५० हजार क्विंटल धान उचल करण्याचे आदेश तत्कालीन व्यवस्थापकांनी राईस मिलर्ससह संगनमत करून दिल्याचा आरोप आहे. पावसाळा सुरू झाल्याने आदिवासी संस्थेमधील उघड्यावर ठेवलेले धान खराब होऊ नये म्हणून प्रथम उघड्यावरील धान उचल करण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र निर्देशाचे पालन न करता केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी आणि राईस मिलर्सला लाभ मिळवून देण्यासाठी आधी गोदामातील धानाची उचल करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे भंडारा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आदिवासी सहकारी संस्थेमधील जवळपास २ लाख क्विंटल धान हा उघड्यावर पडलेला आहे. जर पावसामुळे उघड्यावर ठेवलेले धानाचे नुकसान झाल्यास याची नुकसान भरपाई तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकांकडून वसूल करण्यात यावी. याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी सहकारी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.