केशोरी कनेरी येथे ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:36+5:302021-04-17T04:28:36+5:30
केशोरी : येथे कोरोना विषाणूचा झालेला उद्रेक लक्षात घेता वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा ...
केशोरी : येथे कोरोना विषाणूचा झालेला उद्रेक लक्षात घेता वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केशोरी, कनेरी या गावांना कंटेन्मेंट झोन घोषित करून त्याबाबतचा आदेश (१५) रोजी जारी केला आहे. कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती ठरलेल्या मुदतीच्या आत इतर नागरिकांच्या थेट संपर्कात येऊ नयेत, म्हणून केशोरी, कनेरी येथील रस्ते बॅरिकेडस् लावून सील करण्यात आली आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, कनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये ५ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ६५ नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन कोरोनाचा उद्रेक झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले अर्जुनी-मोरगाव यांनी १५ तारखेला अधिसूचना जारी करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ये- जा करणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहेत. या गावात येण्या-जाण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना बाहेर जाण्यासाठी पूर्णत: प्रतिबंध लावण्यात आला आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना कोरोना प्रोटोकाॅलनुसार औषधोपचार करून घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अलगीकरणातील रुग्णांपासून इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. प्रतिबंधित भागात प्रवेशासाठी शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी ओळखपत्राच्या आधारे, अत्यावश्यक तातडीने वैद्यकीय कारण, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित सेवांना प्रतिबंधापासून सूट देण्यात आली आहे.
....
नियमांचे उल्लघंन केल्यास कारवाई
लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
....कोट...
‘स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत पाच कर्मचारी व त्यांची संपूर्ण कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्याने आरोग्यसेवा पुरविण्यासाठी येथील आरोग्ययंत्रणा तोकडी पडत असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर ठिकाणांवरील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची अत्यंत गरज आहे.
-डॉ. पिंकू मंडल, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, केशोरी