केशोरी प्रमुख रस्ता झाला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:05+5:302021-02-15T04:26:05+5:30
केशोरी : गावामधून तालुक्याला जाणारा प्रमुख रस्ता खड्डेमय झाला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. बऱ्याच दिवसांपासून या महत्त्वाच्या रस्त्यावर ...
केशोरी : गावामधून तालुक्याला जाणारा प्रमुख रस्ता खड्डेमय झाला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. बऱ्याच दिवसांपासून या महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने या रस्त्याची स्थिती जैसे थे झाली आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
या रस्त्यावरून एखादा अपघात होवून त्यामध्ये एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून केशोरीच्या मधोमध जाणाऱ्या प्रमुख गावरस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्येच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता आड आली होती. परंतु, आता ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडून नवीन गावकारभाऱ्यांनी गावविकासाची सूत्रे सांभाळली आहेत. त्यामुळे नव्या दमाने गावातील प्रमुख रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असून शालेय विद्यार्थीसुध्दा दिवसभर जाणे येणे असते. या रस्त्याच्या वर्दळीचे प्रमाण लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नातून रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून बायपास रस्ता मंजूर करुन घाईघाईने रस्ता निर्मितीच्या कार्याचे भूमिपूजनही उरकले होते. परंतु, त्या बायपास रस्तानिर्मितीचे कार्य प्रलंबित आहे. बायपास रस्ता निर्मितीचे घोडे कुठे अडले , याचा अजून थांगपत्ता नाही. हे फक्त राजकीय मंडळीच सांगू शकतील. गावातील प्रमुख रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना व वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.