सार्वजनिक उत्सवावर ‘खाकी’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:09+5:302021-09-14T04:34:09+5:30
देवरी : देवरी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी देवरी पोलिसांनी या उत्सवावर करडी नजर ठेवली ...
देवरी : देवरी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी देवरी पोलिसांनी या उत्सवावर करडी नजर ठेवली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे प्रयत्नशील आहेत.
देवरी पोलीस स्टेशन सीमेअंतर्गत यावर्षी ५१ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सिंगनजुडे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आढावा घेत आहेत. गणेश उत्सव काळात तीन पोलीस अधिकारी, ३६ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त पोलीस उपमुख्यालयाची व देवरी पोलीस स्टेशनची एक अधिकारी व दहा पोलीस कर्मचाऱ्यांची स्ट्राइकिंग फोर्स वेगळी तयार करण्यात आली आहे.
सार्वजनिक मंडळानी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा. शासनाच्या नियमांचे पालन करून मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा याबाबतच्या सूचना पूर्वीच पोलीस प्रशासना दिल्या आहेत. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
बॉक्स.....
२२ गावात एक गाव एक गणपती
पोलीस ठाणे हद्दीत एकूण ५१ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना २२ गावांमध्ये राबविण्यात येत आहे व सर्वच ५१ गणेश मंडळांनी रीतसर परवानगी घेतली आहे.
बॉक्स...
पोलिसांनाही सूचना
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश पोलीस निरीक्षकांनी सहायक निरीक्षकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यंदादेखील कोरोनाच्या सावटाखाली उत्सव साजरा होत आहे. मात्र या दरम्यान कुठेही गडबड, गोंधळ होणार नाही. तसेच जुने वाद उफाळणार नाहीत, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांमध्ये अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासोबतच, चेन स्नॅचिंग, छेडछाड होणार नाही याकरिता साध्या पोशाखात काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सट्टा आणि जुगार यावर नियमित कारवाई चालू असून पोलीस सतत पेट्रोलिंग करीत आहेत.