खालसा सेवादलाची गुरू का लंगर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:49 AM2018-10-06T00:49:44+5:302018-10-06T00:50:31+5:30
भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, बेघरांना आसरा आणि भरकटलेल्यांना मार्ग दाखविणे हाच उपदेश श्री गुरूनानकजीदेव यांनी दिला आहे. त्यांच्या याच उपदेशाला प्रत्यक्षात उतरवित येथील खालसा सेवादल व शिख समाजाच्या वतीने, गुरू का लंगर नि:शुल्क भोजनदान सेवा सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, बेघरांना आसरा आणि भरकटलेल्यांना मार्ग दाखविणे हाच उपदेश श्री गुरूनानकजीदेव यांनी दिला आहे. त्यांच्या याच उपदेशाला प्रत्यक्षात उतरवित येथील खालसा सेवादल व शिख समाजाच्या वतीने, गुरू का लंगर नि:शुल्क भोजनदान सेवा सुरू करण्यात आली.
श्री गुरूनानकदेवजी यांच्या उपदेशानुसार गरीबांची सेवा, भुकेल्यांना पोटभर अन्न देणे हीच सर्वात मोठी सेवा आहे. याच उद्देशाला जपत येथील खालसा सेवादल व शिख समाजाने मागील पंधरा दिवसांपासून शहरात नि:शुल्क भोजनदान सेवा सुरू केली आहे. यासाठी एक विशेष वाहन तयार करण्यात आले असून हे वाहन शहरातील विविध चौकात उभे केले जाते. या सेवेला गुरु का लंगर असे नाव देण्यात आले आहे.
या सेवेची गोरगरीबांना मदत व्हावी यासाठी कोणत्या भागात भोजनदान वाहन केव्हा उभे राहील याचे वेळापत्रक तयार केले आहे. खालसा सेवादलाचे भोजनदान वाहन सकाळी ११ ते १ या वेळेत केटीएस रुग्णालय, दुपारी १ ते ३ बाई गंगाबाई महिला रुग्णाालय, सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यत रेल्वे स्टेशन परिसरात राहते. ही सेवा नोब्हेबंरपर्यत सुरू राहणार आहे. तसेच गुरूनानकदेवजी यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वा निमित्त ही सेवा सर्मपित करण्यात आली.
रुग्णांच्या नातेवाईकांना मदत
खालसा सेवादलाने सुरू केलेल्या गुरू का लंगर सेवेची मोठी मदत केटीएस, बीजीडब्ल्यू रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे. त्यांना बाहेर पैसे मोजून जेवण करावे लागत होते. मात्र हे सर्वांना झेपण्यासारखे नव्हते. त्यामुळे गुरू का लंगर नि:शुल्क भोजनदान सेवेची त्यांना मदत होत आहे.
समाजबांधवांचा पुढाकार
श्री गुरूनानकदेवजी यांच्या उपदेशानुसार गोरगरीबांच्या सेवेत खरा आनंद आणि खरे सुख आहे. हाच मुलमंत्र येथील खालसा सेवा दल व शिख समाजबांधव जपत आहे. नि:शुल्क भोजनदान सेवेकरीता समाजबांधव स्वत:हून पुढे येत आहे. यात समाजातील युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असून या सेवेतून एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळत असल्याचे शिख समाजाचे जसपालसिंह चावला, वजिंदरसिंह मान, मंसू होरा, संतवीरसिंह मथारु यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वाटसरुंना दिलासा
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे प्रमुख स्थानक आहे. येथून हजारो प्रवाशी ये-जा करतात. तर रात्रीच्या वेळेस अनेक प्रवाशी गाडीच्या प्रतीक्षेत रेल्वे स्थानकावर थांबतात. त्यांना सुध्दा गुरू का लंगर नि:शुल्क भोजनदान सेवेची चांगलीच मदत होत आहे.