खांबी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:28 AM2021-04-10T04:28:49+5:302021-04-10T04:28:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : नजीकच्या ग्राम खांबी (पिंपलगाव) येथे दोन दिवसांच्या कोरोना चाचणीमध्ये गावातील २३ जण कोरोनाबाधित आढळले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : नजीकच्या ग्राम खांबी (पिंपलगाव) येथे दोन दिवसांच्या कोरोना चाचणीमध्ये गावातील २३ जण कोरोनाबाधित आढळले. लहानशा या गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांचे पत्रान्वये अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी खांबी हे संपूर्ण गाव कन्टेनमेंट झोन म्हणून घाेषित केले आहे.
खांबी गावात रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात आली. दिनांक ६ एप्रिल रोजी १६ तर ७ एप्रिल रोजी ७ अशा २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ३४० घरांमधील १ हजार १२६ लोकवस्तीच्या या गावात कोरोनाचा उद्रेक झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित आढळलेले सर्वजण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. खांबी येथील ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली असता, २३ जण बाधित आढळून आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नजीकच्या गावांमध्ये पसरु नये, याकरिता सार्वनजिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोविड-१९ विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता लोअर झोनमध्ये या गावाचा समावेश करण्यात आला आहे. खांबी गावात येणारे व जाणारे सर्व मार्ग तत्काळ प्रभावाने बंद करुन सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
........
गावकऱ्यांसोबत बैठक
खांबी गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित होताच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी ग्रामस्थांसोबत शुक्रवारी (दि. ९) दुपारी बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार विनोद मेश्राम, पोलीस निरीक्षक महादेव तोदले, खंडविकास अधिकारी राजृू वलथरे, तालुका आरोग्य अधिकारी तथा कोरोना नोडल अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन फुलसुंगे, सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीसपाटील नेमीचंद मेश्राम, तंटामुक्त समिती अध्यक्ष भगवान मेंढे, ग्रामसेविका रोषण भैसारे, तलाठी सुरेश हरिणखेडे उपस्थित होते. गाव कन्टेनमेंट झोनमध्ये असल्याने ग्रामस्थांनी शासन आदेशातील नियमांचे तंतोतंत पालन करावे. गावची सीमा ओलांडू नये तसेच कोरोनाचे संक्रमण होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
....
स्वस्त धान्य दुकानामार्फत घरपोच अन्नधान्य पोहोचविणार
खांबी गावात पिंपळगाव, इंजोरी, निमगाव, बोंडगावदेवीकडून होणारी ये-जा बंद करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, किराणा विक्री करणारे तपासणी करुनच ये-जा करतील. शेतकऱ्यांना शेती कामासाठी रजिस्टरवर नोंद करुन जाण्या-येण्याची मुभा देण्यात आली आहे. गावातील सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. दोन पोलीस ग्रामस्थांसोबत राहणार आहेत. स्वस्त धान्य दुकानामार्फत घरपोच अन्नधान्य पोहोचविले जाणार आहेत. गावातील पानटपरी, पानठेले, पूर्णत: बंद राहणार आहेत. किराणा दुकानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत राहणार आहे.