१ लाख ९९ हजार हेक्टर होणार खरिपाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:32+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून सरासरी १३२७ मीमी.पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानपिकांसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. तर ६ हजार ४४ हेक्टरवर तूर, १२०४ हेक्टर तीळ, १८२८ हेक्टर भाजीपाला, ८७० हेक्टर ऊस अशा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा खरीपात लागवड केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृगाचा पाऊस पडताच शेतकरी खरीपाच्या कामाला लागतात. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार असून पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यात बळीराजा सध्या व्यस्त असल्याचे चित्र आहे. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी वेळीच पाऊस झाल्यास पेरणी करता यावी यादृष्टीने नियोजन केले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून सरासरी १३२७ मीमी.पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानपिकांसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. तर ६ हजार ४४ हेक्टरवर तूर, १२०४ हेक्टर तीळ, १८२८ हेक्टर भाजीपाला, ८७० हेक्टर ऊस अशा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा खरीपात लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी मृग नक्षत्राचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. रविवारपासून (दि.७) मृग नक्षत्राला सुरूवात झाली. जिल्ह्यातील काही मृगाच्या पावसाने दमदार हजेरी सुध्दा लावली. मात्र अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी होती. त्यामुळे याचा शेतीच्या कामावर सुध्दा परिणाम झाला होता.
खरीप हंगामपूर्व शेतीची कामे लांबली होती. मात्र आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शेतकरी सुध्दा नवीन जोमाने कामाला लागला आहे. पेरणी योग्य पाऊस होताच वेळेत पेरणी करता यावी यासाठी बळीराजा खते, बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
खते बियाणांचा पुरेसा साठा
खरीप हंगामा दरम्यान जिल्ह्यात खते, बियाणांचा तुडवडा निर्माण होवू नये यासाठी कृषी विभागाने यंदा त्यादृष्टीने नियोजन केले आहे. मागील वर्षी कृषी विभागाने ४५ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. तर यंदा कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन विचारात घेवून ६८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. यापैकी ६३ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध देखील झाले आहेत. तर संपूर्ण खरीपासाठी एकूण ८३ हजार मेट्रीक टन विविध खतांची मागणी केली असून त्यापैकी २३ हजार मेट्रीक टन खते उपलब्ध असून खरीपात खताची टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
२३८ बियाणांचे घेतले नमुने
खरीप हंगामादरम्यान खते आणि बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. कृषी विभागाने कृषी केंद्राकडून एकूण २३८ बियाणांचे नमुने घेतले होते. त्यापैकी दोन बियाणांचे नमुने फेल झाल्याने कृषी विभागाने सदर बियाणे विक्री बंदचे आदेश दिले आहे. तसेच २७४० किलो बियाणे विक्रीस मनाई केली आहे.
चार कृषी केंद्रावर कारवाई
खते आणि बियाणे विक्रेत्यांनी नियमांचे उल्लघंन केल्याने कृषी विभागाने जिल्ह्यातील दोन कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलबिंत केले आहे तर दोन कृषी केंद्रावर विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे.
९ भरारी पथकाची असणार नजर
खरीप हंगामादरम्यान कृषी केंद्र संचालकाकडून नियमांचे उल्लंघन केले जावू नये, खते, बियाणांचा काळाबाजार होवू नये यासाठी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर ९ भरारी पथके गठीत करण्यात आले. या भरारी पथकांची नजर यासर्वांवर असणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.