१ लाख ९१ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:26 PM2019-04-29T21:26:06+5:302019-04-29T21:26:24+5:30
मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. तर यापैकी ९८ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यातील एकूण लागवड योग्य क्षेत्रापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर धानासह इतर पिकांची लागवड केली जाणार आहे. तर मागील वर्षी १ लाख ५२ हजार २५० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ४८ हजार ४१३ हेक्टरने वाढ झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडत असल्याने धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सरासरी ९०० ते १००० मि.मी.पावसाची गरज असते. तर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते.त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी धान लागवडीवर अधिक भर देतात. तर खरीपानंतर रब्बी हंगामातही जवळपास २८ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानासह, तूर, मुंग, उडीद या पिकांची सुध्दा लागवड केली जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांचे सुध्दा नियोजन कृषी विभागाने केले आहे.खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या ७१ हजार मेट्रीक टन खताची तर ६२ हजार ५४० क्विंटल धानासह इतर बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे.यापैकी काही प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध सुध्दा झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस झाल्यास धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.