१० गावांतील धान पिकावर कीडरोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:17 PM2018-10-03T22:17:11+5:302018-10-03T22:21:19+5:30
यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा पावसाने चांगली साथ दिली असून पिकांची स्थिती चांगली असतानाच त्यावर आता कीडरोगांनी हल्ला केला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील १० गावांत धान पिकावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागान दिला आहे. अस्मानी व सुल्तानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी पावसाने साथ दिली नाही. यंदा पावसाने साथ दिली तर किडरोगांनी डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी शेतकºयांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धान पिकांवर किडरोगाचा प्रभाव असून तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.
यात, तालुक्यातील रजेगाव, शिवनी, उमरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव, खोडशिवनी, हेटी (गिरोला), पुरकाबोडी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर, प्रतापगड व देवरी तालुक्यातील पिंडकेपार या गावांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीतील सर्वेक्षण करण्यात आले. त्या अहवालात रजेगाव येथे ०.६० टक्के, शिवनी येथे ०.८० टक्के, उमरी येथे ३.०७ टक्के, खोडकिड्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. तर घटेगाव येथे २.२० टक्के धान पिकावर कडा-करपाचा प्रभाव १७ तारखेपर्यंत होता.
हेटी (गिरोला) येथे १.३ टक्के, घटेगाव येथे १.१५ टक्के, पुरकाबोडी येथे १.०५ टक्के, इसापूर येथे १.६५ टक्के, प्रतापगड येथे १.४८ टक्के पिकार कडा-करपाचा प्रभाव दिसला आहे. घटेगाव येथे १.५५ टक्के, खोडशिवनी येथे १.०२ टक्के, हेटी येथे १ टक्के, इसापूर येथे १.३ टक्के व पिंडकेपार येथे १.३३ टक्के मानमोडी किडींचा प्रकोप होता. तुडतुडाचा प्रकोप वाढण्याची शक्यता सध्या पाऊस थांबला असून चांगलेच उन्ह तापत आहे. अशा या वातावरणात धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी विभागाने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तुडतुडा नियंत्रण मोहिम चालविली होती. यामुळे याचा प्रभाव जिल्ह्यात कमी दिसला व त्यामुळेच नुकसानही कमी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
आता खोडकिडा गादमाशी, कडा-करपाचा धान पिकावर प्रभाव होण्याची शक्यता नाही. त्यांच्या प्रकोपाची वेळ आता निघून गेली आहे. मात्र वातावरण बघता तुडतुड्याचा प्रभाव दिसू शकतो. यामुळे सतर्क राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.
-एन.वी.नयनवाडे
प्रभारी सहायक, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया