२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:51 AM2017-10-27T00:51:24+5:302017-10-27T00:51:36+5:30
आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. कृषी विभागाने सुध्दा २० हजार हेक्टरमधील धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. परिणामी जिल्ह्यातील धानपिक संकटात आल्याचे चित्र आहे.
यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा, खोडकीडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीडरोगांमुळे शेतकºयांना हाती आलेले पिक गमविण्याची वेळ आली आहे. कीडरोग नियंत्रणासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहे. मात्र कीडरोगासाठी पोषक वातावरण असल्याने फवारणीचा कसालाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यातील धानपिकांवर कीडरोगांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी कीडरोगांमुळे शेतातील पूर्ण पिक फस्त झाल्याने देवलगाव येथील दोन शेतकºयांनी त्रस्त होवून साडेचार एकारातील धानपिक जाळून टाकले. आधीच कमी पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही, अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे.
जिल्ह्यात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने आधीच ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यातच आता धानाचे पिक शेतकºयांच्या हाती येण्याची स्थिती असताना २० हजार हेक्टरवरील धानपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांवर संकट ओढवले आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
तातडीने पंचनामे करा
जिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश बुधवारी (दि.२५) जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या दरम्यान कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचीे माहिती आहे.