गोंदिया रेल्वे स्थानकावर किड्स झोन

By Admin | Published: January 21, 2017 12:11 AM2017-01-21T00:11:26+5:302017-01-21T00:11:26+5:30

प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशीर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात.

Kids zone at Gondia railway station | गोंदिया रेल्वे स्थानकावर किड्स झोन

गोंदिया रेल्वे स्थानकावर किड्स झोन

googlenewsNext

पालकांना दिलासा : प्रवाशांच्या मुला-मुलींसाठी मिळणार सुविधा
देवानंद शहारे   गोंदिया
प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशीर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात. पण त्यांच्यासोबत असलेल्या बालकांना मात्र हा वेळ काढणे कठीण जाते. त्यांना मोकळे खेळताही येत नाही. पण आता ही अडचण दूर होणार आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी आता गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर खास ‘किड्स झोन’ तयार केला जाणार आहे.
या किड्स झोनमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बालकांसाठी खेळण्यातील हत्ती, घोडे व इतर खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिनाभराच्या कालावधीत हे खेळ साहित्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा वेळ आनंदात जाणार आहे.
गोंदिया रेल्वे विभागाला नुकतेच रेल्वे बोर्डाकडून एक पत्र मिळाले आहे. या पत्रात रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या ० ते ७ वर्षे वयोगटातील बालकांसाठी खेळ साहित्य लावण्याच्या उद्देशाने जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानंतर आता जागा शोध अभियान रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सात प्लॅटफॉर्म आहेत. यापैकी कोणत्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र जागेचा विचार केल्यास होमप्लॅटफॉर्मवरच जागा खाली असल्याचे आढळते.
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म- ३ व ४ वरून सर्वाधिक गाड्या चालतात. या प्लॅटफार्मवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते. ही बाब लक्षात घेता सर्वात आधी प्लॅटफार्म-३ व ४ वर ही सुविधा उपलब्ध केली जावू शकते. तसेच या प्लॅटफार्मवरील आरोग्य विभागाला त्यांचे कार्यालय खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेथे द्वितीय श्रेणीचे प्रवासी प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच ठिकाणी हे खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची शक्यता अधिक आहे.
विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मुलांना खेळण्यासाठी किड्स झोनचे निर्माण व खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची सुविधा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात सर्वात आधी गोंदिया रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु यापूर्वी रायपूर रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तेथील एका दानदात्याने पुढाकार घेतला आहे. ३० हजार रूपये किमतीचे खेळ साहित्य त्या दानदात्याने तेथे स्वत:कडून उपलब्ध करून दिले आहेत. गोंदियातसुद्धा दानदात्यांची मदत घेतली जावू शकते किंवा रेल्वे सदर खेळ साहित्य उपलब्ध करून देईल, याबाबत गोंदियाचे रेल्वे अधिकारी अनभिज्ञ आहेत.

रेल्वे बोर्डाकडून पत्र मिळाले आहे. प्रवाशांच्या मुलामुलींना खेळण्यासाठी ही सुविधा द्यायची आहे. आणखी काही निर्देशांची प्रतीक्षा आहे. यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. सध्या जागेचा शोध घेणे सुरू आहे.
-मुकेश कुमार
स्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य)
रेलवे स्टेशन, गोंदिया
 

Web Title: Kids zone at Gondia railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.