जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By नरेश रहिले | Published: August 23, 2024 07:46 PM2024-08-23T19:46:54+5:302024-08-23T19:47:12+5:30
जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली.
नरेश रहिले
गोंदिया : जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली. विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे (वय २९, रा. छोटा गोंदिया) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
विकास फरकुंडे व आरोपी लक्की सुनील मेश्राम (वय १८, रा. संजयनगर) यांचे जुने भांडण होते. असे असतानाच गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजता छोटा गोंदिया येथे त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून आरोपी लक्की मेश्राम व दोन विधी संघर्ष बालकांनी त्याला धारदार शस्त्राने गळ्यावर, छातीवर, पोटावर व शरीरावर वार करून ठार केले. श्रीराम बुधराम फरकुंडे (वय ६०, रा. छोटा गोंदिया) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम कलम १०३ (१) अन्वये शुक्रवारी (दि.२३) पहाटे ३:०८ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना शोधण्यासाठी विविध पथके
या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून काही वेळातच आरोपींना ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई
हा प्रकार घडल्यानंतर एकच खळबळ माजली व पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कसोशीने शोध घेऊन तत्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक शहर आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात, शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, अजय रहांगडाले, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, खंदारे यांनी कारवाई केली.
आरोपींना केले शहर पोलिसांच्या स्वाधीन
- आरोपी लक्की मेश्राम व विधी संघर्ष बालकांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई प्रक्रिया शहर पोलीस करीत आहेत.
दोन महिन्यांपासून सुरू होता वाद
- दोन विधी संघर्षित बालक व आरोपी लक्की मेश्राम यांचा मृत विकास फरकुंडे याच्यासोबत मागील दोन महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादाची परिणीती खुनात बदलली आहे.