किसान ॲपचे ‘वराती मागून घोडे’, वादळवारे येऊन गेल्यावर अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:26+5:302021-05-24T04:28:26+5:30
गोंदिया : वातावरणातील बदलासह, पीक लागवड पद्धतीत, कीडरोगांचे व्यवस्थापन, वेळोवेळी पिकांवर होणाऱ्या कीडरोगांच्या प्रादुर्भावाची माहिती आणि त्यावर उपाययोजना करण्याची ...
गोंदिया : वातावरणातील बदलासह, पीक लागवड पद्धतीत, कीडरोगांचे व्यवस्थापन, वेळोवेळी पिकांवर होणाऱ्या कीडरोगांच्या प्रादुर्भावाची माहिती आणि त्यावर उपाययोजना करण्याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी विभागाने किसान पोर्टल सुरू केले आहे. यालाच जोड आता किसान ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वादळीवारे, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा अलर्ट दिला जातो. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या कायम असल्याने आणि कृषी विभागाकडून अपडेट मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना बऱ्याचदा संकटाला तोंड द्यावे लागते. नेटवर्कअभावी बऱ्याचदा वादळी पाऊस आणि गारपीट यांची पूर्वसूचना वेळीच मिळत नसल्याने किसान ॲप हे शेतकऱ्यांसाठी एकप्रकारे ‘वराती मागून घोडेच’ ठरत आहे. या ॲपचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना वेळीच माहिती देण्यास याची मदत होऊ शकते. जिल्ह्यात या ॲपवर ४५ हजारांवर शेतकरी जुळले आहेत.
........
किसान ॲपवर काय मिळते माहिती
- शेतकऱ्यांना पीक लागवड पद्धतीची माहिती देऊन उत्पादनात कशी वाढ करता येईल यावर मार्गदर्शन.
- हवामानातील बदल, गारपीट, पाऊस याची पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली जाते.
- हवामान विभागाने वातावरणातील बदलांच्या वेळोवेळी दिलेल्या अलर्टची माहिती.
- पिकांवरील कीडरोग व्यवस्थापनाची माहिती देणे.
- शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषीविषयक योजनांची माहिती देणे.
- आधुनिक कृषी तंत्रज्ञान व कृषीविषयक घडामोडींची माहिती किसान ॲपच्या माध्यमातून दिली जाते.
....................
अपडेट वेळेत मिळाल्यास मदत
- कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले किसान ॲप फायदेशीर आणि मार्गदर्शक आहे.
- या ॲपच्या माध्यमातून हवामानातील बदल, तसेच इतर गोष्टींचे अपडेट शेतकऱ्यांना वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यास मदत होईल.
- कीडरोगांपासून पिकांचे संरक्षण, वेळीच कीडनाशक फवारणी करणे, आदी गोष्टी करणे शक्य होईल.
- त्यामुळे कृषी विभागाने यातील त्रुटी दूर केल्यास ॲप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
........
कोट
वातावरणात वेळोवेळी होणारे बदल, अवकाळी पाऊस, गारपिटीचा इशारा, पीक लागवड पद्धतीची माहिती किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. एक प्रकारे हे ॲप शेतकऱ्यांना वेळीवेळी गाइड करण्याचे काम करते.
- गणेश घोरपडे, अधीक्षक कृषी अधिकारी.
...............
इशारा मिळाला; पण वादळ येऊ गेल्यानंतर
कोट
मी कृषी सेवकाच्या मदतीने किसान ॲप माझ्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले. या ॲपच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना मिळत असल्याने या ॲपची मला मदत होत आहे.
- जगदीश बांगरे, शेतकरी
.......
माझ्या मोबाइलमध्ये किसान ॲप डाऊनलोड केले आहे. मात्र, आमच्या भागात नेटवर्कची समस्या असल्याने बरेच कृषी विभागाकडून दिले जाणारे अलर्ट वेळेवर मिळत नाहीत. कधी कधी पाऊस येऊन गेल्यावर त्याची सूचना मिळते.
- देवीदास वाघमारे, शेतकरी
.......
कधी कृषी विभागाकडून ॲपवर अपडेट माहिती मिळत नाही. त्यामुळे नियोजन करण्यास अडचण होत असल्याने अवकाळी पाऊस किंवा गारपिटीमुळे नुकसानदेखील सहन करावे लागते. -
विलास दमाहे, शेतकरी.