कोया पुनेमला उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 02:02 AM2016-02-26T02:02:22+5:302016-02-26T02:02:22+5:30
देशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय ...
आदिवासी कलावंतांचा आविष्कार : कचारगडच्या कुशीत घडले गोंडी संस्कृतीचे दर्शन
विजय मानकर सालेकसा
देशातील १६ ते १७ राज्यातून कचारगड येथे दाखल झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध आयोजनांमुळे विशेष करुन गोंडी धर्मीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाच दिवसीय मेजवानीमुळे कचारगडच्या कुशीत गोंडी संस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष घडून आल्याचे दिसले. मागील ३० वर्षांपासून चालत असलेली कचारगड यात्रा यंदा यशस्वी आयोजनाचे शिखर गाठताना दिसून आली.
दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त सुरू होणारी कचारगड यात्रा यंदा २० फेब्रुवारीला सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच येथे भाविकांची रीघ लागली. २१ फेब्रुवारीला ध्वजारोहणानंतर शंभूसेकची भाविकांचा ओघ कचारगडकडे वाढला. हळूहळू देशाच्या कोणा-कोपऱ्यातून आदिवासी भाविक येथे दाखल घेऊ लागले. पाहतापाहता लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी वाढू लागली.
२२ फेब्रुवारी रोजी कोया पूनेम (माघ पौर्णिमा) पूजा असून या दिवशी आदिवासी समाजाचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. या एकाच दिवशी चार लाखापेक्षा जास्त भाविक येथे येऊन कोया पूनेमी पूजा करून आपल्या पूर्वजांना नवस फेडण्याचे काम आदिवासी महिला-पुरूषांनी केले आहे. ज्यांना २२ पर्यंत शक्य झाले नाही त्यांनी २३, २४ व २५ फेब्रुवारीपर्यंत स्थळ गाठले व कचारगड गुफेत आपल्या पूर्वजांची आठवण केली.
कोया पूनेम महोत्सवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले. या राज्यातील मोठ्या प्रमाणात असलेले आदिवासी मोठ्यमोठ्या समुहाने येथे दाखल होताना दिसून आले. त्यांच्या प्रत्येक समुहात आदिवासींचे सप्तरंगी गोंडी ध्वज पकडून आणि विविध वाद्य, ढोल, सनई, किंदरी, मांदरी आदी वाद्यांच्या मधूर संगीतात भाविकांचा लोंढा कचारगडच्या दिशेने येताना दिसत होता.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत छत्तीसगड आणि झारखंड येथील संपूर्ण आदिवासी आपल्या घराला कुलूप लावून आले की काय, असे मत काही लोक व्यक्त करीत होते. २१ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारच्या डोंगरगड येथे आले होते. त्यामुळे छत्तीसगडचे भाविक २१ रोजी मोदींच्या कार्यक्रमात आणि संत रोहिदास जयंती कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे २१ ऐवजी २२ व २३ ला मोठ्या प्रमाणात आले, असे मानले जात होते.
परंतु काही भाविकांशी प्रत्यक्ष चर्चा करून माहिती घेतल्यास त्यांनी म्हटले की, कोया पूनेमी पूजेचा महत्व माघ पौर्णिमेदिवशी १५ व्या तिथीला जास्त असते. त्यामुळे आदिवासी लोक माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे दाखल होण्यास महत्व देतात.
गोंडी गीतांतून गौरवगान
या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतिरिक्त साहित्यकार, कवी, इतिहासकार, संशोधक, धर्माचार्य आदीनींसुध्दा गोंडी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सादर केली. काहींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून, काहींनी गोंडी गीतांच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचा गौरवगान केला. त्यांनी आपापल्या पध्दतीने आदिवासी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान अनेक आदिवासी समाजाचे उच्चपदावर कार्यरत राजकीय मंडळी खासदार, आमदार, आयुक्त, कलेक्टर, सीओ, श्रेणी-१ चे अधिकारी असलेले भाविक येऊन कोया पूनेमी पूजा करून गेले. त्यांनी स्थानिक समितीला आपली ओळख न देताच धार्मिक भावना जपून महापूजा करून निघून गेले.
कोणताही अनुचित प्रकार नाही
मागील ३२ वर्षीपासून चालत असलेल्या या कोया पूनेम महोत्सवात कोणताही अनुुचित प्रकार घडला नाही. भाविकांची संभावित संख्या बघत प्रशासनाने भौतिक सोयी, सुरक्षा व्यवस्था व सतत योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.