बंगळुरूच्या IIM मध्ये गोंदियाचा कोहिनूर, पोराच्या कामगिरीचा सार्थ अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 05:28 PM2021-06-08T17:28:43+5:302021-06-08T17:29:58+5:30
कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे.
गोंदिया - देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या बेंगलोर येथील भारतीय प्रबंधन संस्थेत (आय.आय.एम) येथील पदव्युत्तर उच्च प्रबंधन अभ्यासक्रमासाठी गोंदियातील कोहिनूर कमलेश मेश्राम यांची निवड झाली आहे. देशातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या संस्थेत आपल्या शहरातील विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे गोंदियाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कोहिनूर कमलेश मेश्राम हा सेल टॅक्स कॉलोनी येथील निवासी असून मुळचा तो कटंगी कला येथील रहिवासी आहे. सध्या तो केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालय सी. डॉट. रिसर्च इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. या पदावर कार्यरत असताना वर्ष 2020 मध्ये त्याची निवड संयुक्त राष्ट्र आंतरिक नेवीगेशन ॲपच्या जिनेवा (स्विझरलँड) येथे झालेल्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती हे विशेष. या चमूचे कोहिनूर मेश्राम यांनी प्रतिनिधित्व केले. आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी तसेच गोंदिया शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
वर्ष 2020 मध्ये भारतीय प्रबंधन संस्था बंगळुरूच्या वतीने उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कोहिनूर मेश्राम याने प्राविण्य सूचित प्रथम क्रमांक पटकावित आपल्या शहराचा नाव-लौकिक केलेला आहे.
शिक्षिका कविता व कमलेश मेश्राम यांचा कोहिनूर हा मुलगा असून त्याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. बारावीच्या सी.बी.यस.सी. परीक्षेत देखील त्याने जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याच बरोबर त्याला विविध खेळांचीही आवड आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना दिले आहे. कोहिनूरने संपादन केलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
कोहिनूरचा अभिमान
कोहिनूर हा लहानपणापासूनच हुशार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही त्याने संपादन केलेल्या यशासाठी आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया वडिल कमलेश मेश्राम यांनी दिली.