कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:37 PM2018-08-13T21:37:52+5:302018-08-13T21:38:10+5:30
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनकडून बँकाना प्राप्त झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटत नसल्याने शेतकऱ्यांसह बँकांची सुध्दा कोंडी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनकडून बँकाना प्राप्त झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटत नसल्याने शेतकऱ्यांसह बँकांची सुध्दा कोंडी झाली आहे.
मागील दोन महिन्यांपासून जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून ग्रीन याद्या प्राप्त झाल्या नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. तर दुसरीकडे खरीपातील रोवणीची कामे सुरू असून मजुरी, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याने त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. तर कर्जाच्या थकबाकीची रक्कम भरल्यास या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्हीकडून कोंडी झाली आहे. शेतकरी दररोज बँकेत जावून ग्रीन यादी आली का अशी विचारणा अधिकाऱ्यांना करीत आहे.
मात्र याद्या आल्या नसल्याने त्यांना आल्यापावलीच निराश परत जावे लागत आहे. रोवणीची कामे वेळेत न केल्यास हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे शेतकरी नातेवाईक आणि सावकारांकडून पैशाची उचल करुन रोवणीची कामे करीत आहेत. दोन महिन्याचा कालावधी लोटून दहावी ग्रीन यादी आली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर ग्रीन यादी मिळण्यास विलंब होत असल्याने बँकाची सुध्दा डोकेदुखी वाढली आहे.
शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड
सध्या रोवणीेचा हंगाम सुरू असून वेळीच रोवणी केली नाही तर हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. तो वाया जावू नये, यासाठी शेतकरी सावकारांकडून व्याजाचे पैसे आणीत आहेत. तर दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने थकीत कर्जावर बँकेचे व्याज वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपलेला नाही. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे रक्कम त्वरीत खात्यावर जमा करा अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.