कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूरला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:13+5:30
४ कोविड गर्भवंतीवर सिझरिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूर करणे पूर्णपणे बंद झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविड गर्भवतींची प्रसूतीची सोय नसल्याने त्यांना नागपूर मेडिकलला रेफर केले जात होते. त्यामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत होता. आता ही अडचण दूर झाली असून येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयात यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत या कक्षात १२ कोविड गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. तर ४ कोविड गर्भवंतीवर सिझरिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूर करणे पूर्णपणे बंद झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत होता.
आता ही समस्या सुध्दा दूर झाली असून नवीन सीटी स्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी केटीएस आणि मेडिकलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात आली आहे.
या दोन्ही रुग्णालयात आतापर्यंत ७७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. यापैकी ५६३ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७१.२६ टक्के आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १६ पैकी ६ डॉक्टर आणि ७१ पैकी ३ परिचारिका रूजू झाल्या आहेत. लवकरच इतर समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता तिरपुडे यांनी सांगितले.
पंधरा दिवसात सुरू होणार प्लाझ्मा थेरपी सेंटर
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सेंटर नसल्याने कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याची अडचण निर्माण होते. तर प्लाझ्मा डोनर तयार असताना सुध्दा थेरपी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने अडचण निर्माण होत होती. ही अडचण आता दूर केली जाणार असून येत्या पंधरा दिवसात मेडिकलमध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता तिरपुडे यांनी सांगितले.
२४ तासात मिळणार अहवाल
गोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेत नमुने तपासणीची संख्या वाढल्याने आठ आठ दिवस अहवाल मिळत नव्हता. परिणामी संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र आता स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले असून २४ तासात स्वॅब नमुन्याचा अहवाल मिळणार आहे.