कोविड सेंटर गुंडाळले, कर्मचारी बेरोजगार झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:03+5:30
त्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच्या रोषाला सुद्धा समोर जावे लागले. मात्र शासनाने कोविड सेंटर गुंडाळून त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकले. त्यामुळे त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट ओढावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून संपूर्ण जिल्हा कोविडमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यातच सालेकसा तालुका एक महिना पूर्वीच कोविड मुक्त झाला व लगेच ८ जुलैला येथील कोविड केअर सेंटर सुद्धा गुंडाळले. त्यामुळे एकीकडे आरटीपीसीआर चाचण्या बंद करण्यात आल्या. परंतु त्याच बरोबर आरोग्य विभागाने आता कोविड केअर सेंटरवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त केला आहे. त्यामुुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
मागील दीड वर्षांपासून कोविड १९ नावाच्या विषाणूने सर्वत्र कहर माजविला असून या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सुद्धा कोविड १९ चा शिरकाव झाला आणि आरोग्य विभाग हतबल होऊ लागले. अशात आरोग्य विभागाने जिल्हा मुख्यालयातील कोविडचा औषधोपचार करण्याचा तसेच चाचण्या करण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच कोविड रुग्णांची ताबडतोब नमूना तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तसेच इतर मुख्य ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले. या सेंटर येणाऱ्या प्रत्येक संशयीत रुग्णांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्टची सोय.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी औषधोपचार तापमान, ऑक्सिजन लेवल तपासणी, औषध साठा तसेच गंभीर रुग्णांसाठी भरतीची सोय सोबतच क्वारंटाईन सेंटर सुद्धा उभारण्यात आले. या सर्व सोयी सुविधा सुरक्षित व सुरळीतरित्या पुरविण्यासाठी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. परंतु २४ तास सतत सेवा देताना ताण वाढत चालल्यामुळे इतर अंशकालीन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच्या रोषाला सुद्धा समोर जावे लागले. मात्र शासनाने कोविड सेंटर गुंडाळून त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकले. त्यामुळे त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट ओढावले आहे. सालेकसा तालुक्यातून सुद्धा दोन स्टाप नर्स, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि एका वाॅर्ड बायला सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात यावे, अशी मागणी केली.
सेवेत कायम ठेवण्याची मागणी
- आरोग्य विभागाने एकूण १३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले त्यात ११ डॉक्टर, १० प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १३ डाटा एन्ट्री ऑपरेटर, ६० स्टॉप नर्स, ९ औषधी निर्माता, ०३ इसीजी टेक्नीशियन, आणि ५ एक्सरे टेक्नीशियन यांचा समावेश आहे. केरळसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुढे महाराष्ट्रात सुद्धा तिसरी लाट येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नसून अशात त्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवणे आवश्यक होते.