मेडिकल मिळूनही केटीएस आजारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 01:04 AM2017-02-09T01:04:43+5:302017-02-09T01:04:43+5:30

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयात विलीन झाले.

KTS sickly along with medical | मेडिकल मिळूनही केटीएस आजारीच

मेडिकल मिळूनही केटीएस आजारीच

Next

वर्षभरापासून सिटीस्कॅन बंद : आरोग्यमंत्र्याच्या आदेशालाही केराची टोपली
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयात विलीन झाले. तरीही २६ जानेवारी २०१६ रोजी बिघडलेली सिटीस्कॅन मशीन आतापर्यंत बंदच आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन स्कॅन करण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही ही सीटीस्कॅन मशिन तातडीने सुरू करण्याची सूचना गेल्यावर्षी केली होती. मात्र त्यालाही आरोग्य प्रशासनाने जुमानले नाही.
लाईफ लाईन एक्सप्रेसच्या उद्घाटनाला ४ मे २०१६ रोजी आरोग्यमंत्री आले असताना त्यांनी सदर सिटीस्कॅन मशीन सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. या सिटीस्कॅन मशीनची दुरूस्ती करण्यात आली नाही. दुरूस्तीसाठी बाहेरून व्यक्ती आणावे लागले. जर्मनी येथून या सिटीस्कॅनचे साहित्य आणण्यात आले. काही साहित्य लावल्यावर रूग्णांच्या सेवेसाठी ही मशीन सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. येथील रूग्णांना सिटीस्कॅनची सेवा घेण्यासाठी खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
ही मशीन मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. येथील रूग्णांना खासगी रूग्णालयात सेवा घ्यावी लागत आहे. एका रूग्णावर अडीच हजार रूपये सिटीस्कॅनचा खर्च पडतो. गरिब रूग्णांच्या माथ्यावर सिटीस्कॅनचा भार वर्षभरापासून पडत आहे. केटीएस जिल्हा समान्य रूग्णालयात बसविण्यात आलेली सिटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांनाही खासगी रूग्णालयाची सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांचे चांगलेच फावले आहे.

दुरूस्तीसाठी निधीचा अभाव?
सिटीस्कॅन मशीन चालविण्यासाठी नियमीत तज्ज्ञ नसल्यामुळे सिटीस्कॅन चालविण्यासाठी कंत्राटी तत्वावर डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. परंतु निधी अभावी त्यांना मानधन न दिल्यामुळे या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जाते. सिटीस्कॅन मशीन बंद असल्याचे फलक लावून अधिकारी शांत बसले आहेत.

 

Web Title: KTS sickly along with medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.