कुडवा-तिरोडा मार्ग होणार लवकरच खड्डेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:50+5:302021-09-02T05:02:50+5:30
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणाऱ्या गोंदिया-तिरोडा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरील ...
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणाऱ्या गोंदिया-तिरोडा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ही समस्या आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे मांडली. त्यांनी समस्येची दखल घेत या रस्त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच या मार्गाची लवकरच दुरुस्ती करून रस्ता खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन कुडवा येथील नागरिकांना दिले.
तिरोडा-गोंदिया हा राष्ट्रीय महामार्ग असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील करारही झालेला आहे. त्यामुळे या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करून खड्डे आणि धुळीच्या समस्येपासून नागरिकांना मुक्तता मिळेल, असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी या परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी काही दिवसांपूर्वीच निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच या महामार्गाच्या सिमेंटीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे नागरी सुविधा योजनेतंर्गत १० ग्रामपंचायतींमध्ये विविध सोयीसुविधांसाठी सात कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रथमच ग्रामपंचायतींना कचरा गाड्या, स्ट्रीट लाईन आणि शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे.