कुंभार समाज आजही जगतोय उपेक्षितांचे जीणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 09:40 PM2019-02-14T21:40:38+5:302019-02-14T21:40:53+5:30
तंत्रज्ञानाच्या युगात व चीनी वस्तुंमुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तुंना आता बाजारात भाव व मागणीही नाही. वंश परंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कुंभार समाज आजघडीला उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. त्यांच्या कौटुंबीक उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तंत्रज्ञानाच्या युगात व चीनी वस्तुंमुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तुंना आता बाजारात भाव व मागणीही नाही. वंश परंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कुंभार समाज आजघडीला उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. त्यांच्या कौटुंबीक उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.
गोेंदिया जिल्ह्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी थाटलेला वंश परापंरागत व्यवसाय गावागावात पहावयास मिळतो. मात्र त्यांनी तयार केलेल्या मातीपासून तयात केलेल्या भांड्यांना जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गावखेड्यात भटकंती करुन तयार केलेले भांडे विकावे लागत आहे. वाढत्या महागाई व दुष्काळात कसे तग धरुन राहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याची व्यथा गोरेगाव येथील प्रेमलाल खोपडे यांनी लोकमतकडे मांडली.
पंचवीस वर्षापूर्वी कुंभारांनी तयार केलेल्या भांड्यांना मोठी मागणी होती. घराघरात स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आंघोळीसाठी मातीपासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर व्हायचा. मात्र आजघडीला मातीच्या भांड्यांची जागा स्टिल व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे. विस वर्षापूर्वी गोंदियात मातीच्या भांड्यांची बाजारपेठ भरत होती. तेव्हा कुंभार समाजाच्या व्यवसायाला थोडेफार का होईना सुगीचे दिवस होते.
हल्ली कुंभार समाजाला मातीकृत विविध प्रकारचे भांडे तयार करण्यासाठी मातीपासून तर इंधनापर्यंत सर्वच विकत आणावे लागते. व्यवसायासाठी लागणारा खर्च व यातून मिळणारे उत्पन्न फार कमी असल्याने या व्यवसायाकडे अनेक कुंभार समाजातील तरुणांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे कुंभार समाज मातीपासून दिवा, गंगाळ, घागर, माथन, गल्ले, उदानी, कुंडल्या, कुंडी माठ, पारोली, सुरई, मुर्त्या अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून दारोदारी भटकंती करुन व आठवडी बाजारात त्या वस्तुंची विक्री करुन मिळणाºया तुंटपुज्या उत्पन्नात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. हा आपल्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय असून, आपण तो जोपासला असल्याचे सांगत असत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही ग्रामीण भागात हाताच्या कलेलाही तेवढीच मागणी होती. आजघडीला मूर्ती तयार करण्याचा व्यवसायाला बरे दिवस आहेत. पण हा वर्षभर चालणारा व्यवसाय नाही. वर्षातून सहा महिने हा व्यवसाय चालते. इतर वेळात वेठबिगार राहावे लागते.
कुटुंबातील आई-वडिलांपासून ते लहान्यापर्यंत सारेच या व्यवसायात राबतात. दिवसभर मेहनत करुन मातीचे भांडे गावागावात जाऊन विकावे लागते.पण या मातीच्या भांड्यांना आता तेवढी मागणी नसल्यामुळे या व्यवसायाला उतरती कळा आली आहे.
शासनाकडून मिळते मदत
कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. या समाजाचे अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील मुंढरी येथे मोठे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना मातीचे भांडे बनविण्यासाठी इलेक्ट्रीक साहित्य वाटप करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात असे मोठे प्रशिक्षण व्हायला पाहिजे, अशी मागणी समाजातील नागरिकांनी केली आहे.
लग्नकार्यात मातीच्या भांड्यांची मागणी
हिंदू संस्कृतीत आजही लग्नसोहळ्यात वर-वधूपक्षांकडे मातीपासून तयार झालेल्या भांड्याची मागणी आहे. दोन्ही पक्षाकडे मंडप पूजनाच्या दिवशी लग्न वाण म्हणून लहान भांडे (गाडगे) कलश, गंगार, माथनची माणगी आहे. सुरईची जागा फ्रिजने, स्वयंपाकाची जागा स्टिल व कढईच्या भांड्यांने जरी घेतली असली तरी लग्नसोहळ्यात लग्न वाणाची जागा कशानेही घेतली नाही. त्यामुळे कुंभार समाजाच्या व्यवसायाची त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या भांड्यांची भविष्यात गरज राहणार आहे.
कुंभार समाजाची होती मागणी
पूर्वीच्या काळी कुंभार समाजाची गावच्या पाटलाकडून मोठी मागणी होती. या समाजाचे एकतरी कुटुंब गावात राहयला पाहिजे, यासाठी खास कुंभार कुटुंबाची मागणी होती.पुर्वीच्या काळात कुंभार समाजाने तयार केलेले भांडे गावात उपलब्ध व्हावे हा देखील त्यामागील उद्देश होता.
कुंभार समाजातील तरुण आता शिक्षणाकडे वळत आहे. बरेच तरुण शासकीय सेवेत आहेत. वंश परपंरागत व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण असल्यामुळे इतर व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.
-वामन वरवाडे, मूर्ती कलाकार गोरेगाव.