अदानीसमोर कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:29 AM2017-12-15T01:29:25+5:302017-12-15T01:29:50+5:30
प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे ठप्प झाली होती.
मागील काही दिवसांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्या वाद सुरू आहे. कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक काही व्यक्ती प्रकल्पाला साथ देत असल्याची माहिती कामगारांना कळताच त्यांनी याविरुध्द संताप व्यक्त केला. कामगार गेट क्र.३ समोर आले. मात्र पोलिसांनी वेळीच सर्तक होत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर जाळून तिरोडा-गोंदिया मुख्य रस्ता १५ ते २० मिनीटे रोखून धरला. या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच सर्तक होत परिस्थिती हाताळली. हे आंदोलन चालूच ठेवण्यात येणारे असल्याचे श्रमिक संघाच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी अध्यक्ष हरिष मोरे, व सदस्य तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.