लांजी बसच्या धडकेत मजूर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:45 PM2018-05-03T21:45:54+5:302018-05-03T21:45:54+5:30
येथील लांजी रोडवर खासगी बसच्या धडकेत एक मजूर गंभीर झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घडली. घनश्याम शंभू शिवणकर (३७) रा. शंभूटोला असे बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील लांजी रोडवर खासगी बसच्या धडकेत एक मजूर गंभीर झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घडली. घनश्याम शंभू शिवणकर (३७) रा. शंभूटोला असे बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गुरूवारी दुपारी लांजीकडून आमगावकडे येणारी एस.कुमार ट्रॅव्हलसची बस क्रमांक एम.पी.५० पी १८६८ ने समोरुन येणाऱ्या घनश्याम शिवणकर यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी धावून जात शिवणकर यांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. आमगाव-लांजी मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी बसेस धावतात. मात्र या बसेस चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. लांजी येथील एस.कुमार ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस धावतात. या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरले जातात. या बसेसचा वेग देखील अधिक असल्याने बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र या बसेसवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. गुरूवारी झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील खासगी बसेस बंद करुन कारवाई करण्याची मागणी आहे.
बस सुरु करण्याची मागणी
एस.कुमार ट्रॅव्हल्सच्या लांजी-आमगाव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस वाहकाकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप आहे. मात्र या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस धावत नसल्याने प्रवाशांना खासगी बसेसवरच अवलंबून राहावे लागते. गुरूवारी (दि.३) सुध्दा या खासगी बस मधील प्रवाशांनी अधिक प्रवासी बसविण्यास विरोध केल्यानंतर विरोध करणाऱ्या प्रवाशांना वाहकाने खाली उतरविले. त्यामुळे या मार्गावरील खासगी बसेस बंद करुन गोंदिया आगाराची बस चालविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.