हजार मुलांमागे ६४ मुलींची कमतरता
By Admin | Published: March 8, 2017 01:00 AM2017-03-08T01:00:01+5:302017-03-08T01:00:01+5:30
मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसलाच नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मात २१ ने घट झाली आहे.
नरेश रहिले गोंदिया
मुलगा वंशाचा दिवा समजणाऱ्या लोेकांना कायद्याचा वचक बसलाच नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मात २१ ने घट झाली आहे. सन २०१५-१६ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९५७ मुली जन्माला आल्या होत्या. परंतु यावर्षी सन २०१६-१७ या वर्षात एक हजार पुरूषामागे ९३६ मुली जन्माला आल्याची जिल्ह्याची आकडेवारी दर्शविते. या बातमीने पुन्हा सामाजिक असमतोल होत असल्याची जाणीव होत आहे.
सन २००१ या वर्षी जिल्ह्याचे पुरूषाच्या तुलनेत मुलीचे जन्मदर १००५ होता. त्यानंतर २००९-१० मध्ये ९२९ झाला. सन २०१०-११ मध्ये ९५४, २०११-१२ पुन्हा ९२९ झाला. परंतु सन २०१२-१३ या वर्षात सदर ९७२ वर गेला. परंतु त्यानंतर सतत मुलींचे जन्मदर घटत राहीले. सन २०१३-१४ मध्ये ९४४, २०१४-१५ मध्ये ९५२ होता. २०१५-१६ यावर्षी मुलींच्या आकड्यात वाढ झाली होती. दर हजारी पुरूषांमागे ९५७ मुली जन्माला आल्या होत्या.परंतु यंदा सन २०१६-१७ या वर्षात घटून ९३६ वर हा आकडा आला आहे.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हे अभियान फक्त नावापुरते राहीले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सुधारणा झाली नाही. यामुळे स्त्रीभू्रणहत्या होत असल्याचे म्हणता येईल. सालेकसा व गोंदिया तालुक्यात अत्यंत वाईट स्थिती आहे.
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात सन २००१ मध्ये चांगली स्थिती होती.परंतु त्यानंतर सतत मुलींच्या जन्मदरात घट होतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील दहा महिन्यातील मुला-मुलींच्या जन्मदरावर दृष्टीक्षेप टाकल्यास जिल्ह्याच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात ९१३, सालेकसा तालुक्यात एक हजार पुरुषांमागे ८३४ मुलींना जन्म दिला. जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात १०४७, तिरोडा १०१४, देवरी १००२, सडक-अर्जुनी ९८२, गोरेगाव ९४९ व अर्जुनी-मोरगाव येथे ९३६ आहे.