तिरोडा एसटी आगारात सुविधांचा अभाव
By admin | Published: May 26, 2017 12:35 AM2017-05-26T00:35:46+5:302017-05-26T00:35:46+5:30
नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या व राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत.
महिला वाहक विश्रामगृहात घाण
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या व राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. जिल्ह्यात वाहतूक प्रवासात अधिक महसूल देणारा तिरोडा आगार भंगार झाला आहे. या आगाराचे व्यवस्थापक चोपकर यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी हळू-हळू दिवसेंदिवस सुविधांचा अभाव होत आहे.
तिरोडा आगारामध्ये ७६ वाहक व ७१ चालक असून ४२ शेड्युल १२५ फेऱ्या रोज होतात. उत्पन्न पण चांगलेच आहे. यात १० महिला वाहक व २ दुरुस्ती विभागात यांत्रिक पदावर आहेत. पण या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह नाही. त्यांच्यासाठी साधी चांगली खोलीसुद्धा उपलब्ध नाही.
या बस स्थानकात विश्रामगृहाची केवळ पाटी लावली आहे. पण प्रत्यक्षात तेथे संपूर्ण केरकचरा पडला असतो. गोदामासारखी स्थिती असताना तेथे बसतात तरी कसे? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. याबाबत एका कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता त्याने हेच महिला विश्रामगृह असल्याचे सांगितल्यावर धसकाच बसला.
घाणेरडा विश्रामगृह, संपूर्ण कचरा, पंखा बरोबर नाही, तीव्र उष्णता असताना कुलरची सोय कुठेच नाही. भर उन्हाचे चटके खात प्रवाशांची सेवा करणाऱ्या वाहन चालकांसाठी विश्रांतीची सोय नाही. त्यामुळे काम करण्याची त्यांच्यात मानसिकता कशी काय तयार होईल? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासन एसटी वाहतूक विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. हा पैसा जातो कुठे, मुरतो कुठे, काही पत्ताच नाही. कर्मचारीच सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. वाहक बाहेर जाऊन भोजन करतात. महिला वाहक कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. फोन सुविधेचाही अभावच आहे. कित्येक कर्मचाऱ्यांनी सुविधांचा अभाव होत असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आगार व्यवस्थापकांना सांगितले. पण त्यांचे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. आगारात जिकडे-तिकडे घाण पसरली आहे. सफाईचा अभाव दिसून येतो. खासगी वाहनधारक काळी-पिवळीचे चालक बसस्थानकातून प्रवासी घेऊन जातात, याकडेही दुर्लक्ष होत आहे.या आगारातील बसेस भंगारासारखे झाले असून कुठेही बस पंचर होऊन किंवा तांत्रिक बिघाड होवून उभी राहते. कित्येकदा प्रवाशांना तासनतास बसची वाट पहावी लागते. नागरिक तक्रारी करतात, पण त्यांची ऐकणार कोण? यासाठी काही प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करीत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष पुरवून प्रवाशांच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महिला वऱ्हांड्यातच पाजतात बाळांना दूध
हिरकणी कक्ष महिलांसाठी स्वतंत्र तयार केले, पण तिरोडा आगारात कुठेही महिलांसाठी हिरकणी कक्ष आढळले नाही. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पास तयार केली जाते, त्या ठिकाणी हिरकणी कक्ष म्हणून लिहिलेले दिसते. पण सुविधांचा अभाव. कित्येक महिला उघड्यावर पडदा झाकून आपल्या लहान बाळांना रखरखत्या उन्हात वरांड्यात दूध पाजताना दिसतात. याकडे आगार प्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले आहे.