धान खरेदी केंद्रावर ‘बारदान्याचा’ अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:38+5:302021-07-12T04:18:38+5:30

बोंडगावदेवी : रबी हंगामातील धान खरेदी अडगळीत सुरू आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत धान खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी ...

Lack of ‘bags’ at the grain shopping center | धान खरेदी केंद्रावर ‘बारदान्याचा’ अभाव

धान खरेदी केंद्रावर ‘बारदान्याचा’ अभाव

Next

बोंडगावदेवी : रबी हंगामातील धान खरेदी अडगळीत सुरू आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत धान खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, अद्यापही धान शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे. केंद्रातून निरोप आल्यानंतरच धान केंद्रावर नेण्याची लगबग सुरू होते. मोजके दिवस असताना एकाएकीच बारदाना संपला अशी ओरड आहे. केंद्रावर बारदान्याचा अभाव अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी स्वत:च्या बारदान्यात धान नेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सर्वच बाजूने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

रबी हंगामातील धान खरेदीची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत असल्याची माहिती आहे. अद्यापही परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या घरी रबी हंगामातील धान पडून आहे. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावरून निरोप येण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. संबंधित यंत्रणेनी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी मुबलक प्रमाणात बारदान्याची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत; परंतु त्या केंद्रावर खाली बारदाना मागील काही दिवसांपासून उपलब्ध नाही. नाइलाजास्तव सामान्य गरजू शेतकऱ्यांना बारदान्याची व्यवस्था स्वत: करावी लागते. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

बॉक्स.....

बारदाना, वजनसुद्धा करून आणा

घरात पडलेले धान मोजले जाणार का? या विवचनेत शेतकरी पडला. आर्थिक भुर्दंड सोसून बारदान्याची जमवा-जमव करावी लागते. तुमचाच बारदाना, तुमचेच धान व वजनही धरमकाट्यावर करून आणा या फतव्यांनी शेतकरी मात्र मेटाकुळीस आला. बारदाना परतही मिळत नाही. ऐन खरिपाच्या रोवणी हंगामात शेतकऱ्यांचा धान हमीभाव केंद्रावर मोजण्यासाठी अग्नी दिव्यातून जावे लागते. जगाच्या पोशिंद्याला स्वत: उत्पादन केलेला रबी हंगामातील धान विक्रीसाठी दारोदार भटकावे लागत आहे. केंद्र सुरू आहे; परंतु बारदाना नाही, अशी अव्यवस्था तालुक्यात असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत दिसत आहेत.

Web Title: Lack of ‘bags’ at the grain shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.