केशोरी परिसरात रोजगार हमीच्या कामाची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:09+5:302021-03-20T04:27:09+5:30
केशोरी : या परिसरात कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास नसल्यामुळे शेतीवरच मजूर अवलंबून असतात. नुकतीच रब्बी धान पिकाची रोवणी संपल्यामुळे ...
केशोरी : या परिसरात कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास नसल्यामुळे शेतीवरच मजूर अवलंबून असतात. नुकतीच रब्बी धान पिकाची रोवणी संपल्यामुळे आता मजुरांच्या हाताला काम नाही. यावर्षीच्या उन्हाळ्यातील मार्च महिना संपत आला; परंतु अजूनही या परिसरात रोजगार हमीची कामे सुरू झाली नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात शहराकडे जाणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची फळी रोजगार हमीच्या कामाची वाट पाहात आहे. शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर असलेली कामे त्वरित सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे. यावर्षीचा मार्च महिना संपत आला असतानाही या परिसरात रोजगार हमीची कामे अजूनही चालू झाली नाहीत. नुकतीच रब्बी धान पिकाची रोवणी संपली आहे. सध्या मजुरांच्या हाताला कोणत्याहीप्रकारची कामे नाहीत. पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे जीवन जगायचे कसे, असा मजुरांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात कोणत्याहीप्रकारची कामे नसल्यामुळे अनेक मजूर शहाराकडे गेली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहराकडे गेलेली तरुणांची फळी पुन्हा गावाकडे परत आली. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे वणवण भटकत आहेत. त्यांच्या हाताला कामे मिळवून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या भागात रस्त्याची कामे, तळ्याची कामे, बोडीची कामे, वन विभागाची कामे, मंजुरी मिळूनही मागे पडली आहेत. ती कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची मागणी होत आहे.