मैदानावरील साधनाअभावी तरुणांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:02+5:30
गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सीतेपार (ता.तिरोडा) आणि परिसरातील गावांतील तरूणांची देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याची तडफड सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील सीतेपार, खेडेपार परिसरातील २० गावाच्या मध्यस्थानी सीतेपार येथे असलेल्या मोकळ्या मैदानात परिसरातील ७० ते ८० युवक घाम गाळून मेहनत करीत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : देश सेवेचा ध्यास घेवून सैन्यात जाण्यासाठी सज्ज असलेले काही युवक एकत्र आले मात्र मैदानावर कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तरुणांची प्रचंड गैरसोय होत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सीतेपार (ता.तिरोडा) आणि परिसरातील गावांतील तरूणांची देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याची तडफड सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील सीतेपार, खेडेपार परिसरातील २० गावाच्या मध्यस्थानी सीतेपार येथे असलेल्या मोकळ्या मैदानात परिसरातील ७० ते ८० युवक घाम गाळून मेहनत करीत असतात. परंतु मैदानात सुविधांची वाणवा असल्यामुळे सरावात अडचणी निर्माण होत आहेत.
यावर मात करण्यासाठी तरुणांनी बेरोजगार असतानाही पदरमोड करून मैदानावर स्वखचार्ने तुटपुंजे का असेना एक दोन साधने बसवली आहेत. सीतेपार-खेडेपार परिसरातील कुणाल रहांगडाले, सुमित पटले, मुकुल झंझाड, संगम रहांगडाले, मनोज बघेले, आकाश कटरे, खोमेश ठाकरे, जितेंद्र माहुरले, पिंटु पटले,अक्षय रहांगडाले, सुहास हजारे, सोपान तुमसरे, रविंद्र पारधी, अमित पडोळे, शुभम रहांगडाले, संस्कार माहुरले, विकी रहांगडाले या तरूणांनी खेडेपार येथील मैदानावर सरावाला सुरूवात केली.
या तरूणांना बघुन हळुहळु इतर तरूणही प्रेरित झाले. सुरूवातीला पंधरा ते वीसच्या घरात असणारी ही संख्या बघता बघता शंभराच्या घरात पोहचली आहे. वाढती बेरोजगारी आणि उच्च शिक्षणाची संधी यांच्या व्यस्त समीकरणाने मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण तरूणाला सैन्य भरतीच जवळची वाटु लागते. यासाठी हे तरूण घाम गाळत आहेत.
या तरूणांना मैदान जरी उपलब्ध असले तरी इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मैदानावर शारीरिक कसरतीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची कमतरता नेहमीच भासत असते.
यासाठी या बेरोजगार तरूणांनी पदरमोड करून स्वखचार्ने तुटपुंज्या का असेना साहित्याची खरेदी करून ते मैदानात लावली आहे. तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने युवकांचा सराव सध्या सुरू आहे.