आमगाव ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:41+5:302021-04-28T04:31:41+5:30
आमगाव : येथे ग्रामीण रुग्णालय असून तेथे एमबीबीएस डॉक्टरदेखील कार्यरत आहे. या तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना ...
आमगाव : येथे ग्रामीण रुग्णालय असून तेथे एमबीबीएस डॉक्टरदेखील कार्यरत आहे. या तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था नाही. कोरोना केअर सेंटरमध्ये साध्या जनरेटरची व्यवस्था नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचा आरोप माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे.
ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या सौम्य आजाराच्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे, पण त्या ठिकाणी सोयी-सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोप केला जात आहे. आमगाव ही भवभूती महाराजांची कर्मभूमी व भाजपचा गड आहे. मात्र तरीसुद्धा या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. भाजपचे खासदार, आमदार आढावा बैठक घेण्यात व्यस्त आहेत. त्यांचे या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. जेवढा वेळ आढावा बैठका घेण्यात घालवीत आहेत, तेवढाच वेळ कोविड रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात खर्ची केल्यास निश्चितच त्याचा फायदा होईल. केवळ श्रेयाचे राजकारण करण्याची ही वेळ नसून ही मदत करण्याची वेळ आहे. राजकारण करण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कोरोनाबाधित रुग्णांना औषधे आणि सोयी-सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष दिल्यास निश्चित मदत होईल, असे मत माजी आ. दिलीप बन्सोड यांनी व्यक्त केले आहे.