एटीएममध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:29 AM2021-03-17T04:29:48+5:302021-03-17T04:29:48+5:30
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट अर्जुनी मोरगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक ...
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
अर्जुनी मोरगाव : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहेत. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हाच प्रकार अन्य व्यवसायांबाबतही दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुद्धा अडचणीत आहेत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगाव बांध : वन्य, हिंस्र प्राण्यांकडून शेतशिवार व गावपरिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरूच आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकूळामुळे जंगलप्रवण व त्याला लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे गरजेचे असले तरी नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला काम द्या
गोरेगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोचे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने केली आहे.
गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे. पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यात संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कॉलनीतील पथदिवे बंद
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीतील कित्येक पथदिवे मागील काही दिवसापासून बंद आहेत. यामुळे कॉलनीत रात्री अंधाराचे साम्राज्य असून, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स परिसरातही हाच प्रकार दिसून येतो. कित्येक भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीला ये-जा करताना नागरिकांना त्रास होते. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बंधारा असूनही उपयोग नाही
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम राका-सौंदड मार्गावरील चुलबंद नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, त्याचा काहीच उपयोग घेतला जात नाही.
सुरक्षाकवचविना डीपी धोकादायक
सालेकसा : तालुक्यात अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. धोेक्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते.
बैलबाजारांना उतरती कळा
भंडारा : एकेकाळी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बैलजोड्या विकणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी खरेदीदारच मिळत नसल्याने हे बाजार ओस पडले आहेत.
भररस्त्यावर जनावरांचा ठिय्या
भंडारा : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठा अपघात घडल्यावर कारवाई होणार काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.