मग्रारोहयोच्या कामांवर सोयीसुविधांचा अभाव
By Admin | Published: May 12, 2017 01:19 AM2017-05-12T01:19:50+5:302017-05-12T01:19:50+5:30
शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे.
प्रशासनाने लक्ष घालावे : मजुरांचे हित जोपासले जात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे. या कामावरील मजुरांना काही मुलभूत सोयीसुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि सावलीत विसावा घेण्याकरिता तात्पुरती झोपडीची व्यवस्था अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे या कामांवरील मजुरांना उन्हाचे चटके सहन करीत काम करावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून रोजगार हमी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला. यानंतर मनरेगा ही योजना २००७ पासून अंमलात आली. या योजनेत मजुरांच्या हितांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मागेल त्याला काम तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरवून योजना पारदर्शी ठेवण्याची तरतूद आहे. परंतु योजनेचे निकष बाजूला करुन अधिकाऱ्यांनी मजुरांच्या अधिकारांवर गंडांतर आणल्याचे चित्र दिसून येत आहे. कित्येक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून औषधांची व्यवस्था करण्यात येते. मात्र कामावर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मजुरांना पिण्याकरिता आपल्या घरून पाणी घेऊन यावे लागते. यावरून प्रशासन मजुरांच्या हिताप्रती किती सजग आहे, याची प्रचिती येत आहे. या योजनेत एकंदरीत मजूर भरडून निघत आहेत. पंचायत विभाग आणि जिल्हा रोजगार हमी योजना यंत्रणेने याकडे त्वरीत लक्ष घालून मजुरांच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.
उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी
प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासून जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. उष्माघात होण्याची प्रमुख कारणांमध्ये उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, वाढत्या तापमानाशी सतत संबध येण्याचे कारणाने उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे लकवा मारणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोळे दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन, अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. वाढत्या तापमानात फार वेळ कष्ठाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर व संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाची कपडे वापरू नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत, जलसंजीवनाचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत द्यावे, अधूनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी असे आरोग्य विभाग सांगते.