नवजात शिशु कक्षात फायर इस्टिंगविशरचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:21 AM2021-01-10T04:21:48+5:302021-01-10T04:21:48+5:30
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...
गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ९) घडली. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षात एकही फायर इस्टिंगविशर नसून कक्षाबाहेर फायर सेफ्टीच्या दृष्टीने केवळ एकच फायर इस्टिंगविशर असून यामुळे एखाद्या वेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातील गर्भवती महिला आणि बालकांना दाखल केले जाते. या रुग्णालयाची इमारत फार जुनी असून इमारतीच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत जीर्ण झाली असल्याची बाब यापूर्वीच उघडकीस आली आहे. या रुग्णालयाच्या नवीन इमारतीत सध्या नवजात शिशू कक्ष असूून या कक्षात ३४ शिशूंना ठेवण्याची क्षमता आहे. या इमारतीचे फायर ऑडिट झाले असले तरी या कक्षाच्या आतील भागात फायर इस्टिंगविशर नसून अलर्ट देण्यासाठी अलार्मसुध्दा नाही. कक्षाच्या बाहेर केवळ फायर इस्टिंगविशर लागले आहे. विशेष म्हणजे या कक्षात ३४ शिशूंना ठेवण्याची क्षमता असली तरी बरेचदा ६० पर्यंत शिशू या ठिकाणी दाखल केले जात असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने केवळ एकच फायर इस्टिंगविशर असणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे भंडाऱ्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
नवजात शिशूंच्या कक्षावर नजर ठेवण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या कक्षाबाहेर आणि प्रवेशव्दारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र यापैकी बरेच सीसीटीव्ही कॅमेरेसुध्दा बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासन अद्यापही सजग नसल्याचे चित्र आहे.
......
तीन वाॅर्मर नादुरुस्त
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षात एकूण ३४ वाॅर्मर आहेत. मात्र यापैकी ३ वाॅर्मर सद्यस्थितीत नादुरुस्त आहेत. या कक्षातील वाॅर्मर तसेच इतर यंत्रांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी शासनाने एका खासगी एजन्सींची नियुक्ती केली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन इंजिनिअर असून त्यांना बीजीडब्ल्यू रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातील वॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहावे लागते. त्यामुळे बरेचदा समस्यासुध्दा निर्माण होते.
........
स्वतंत्र फिडर बंद, जनरेटरवर धुरा
रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यात कुठलीही अडचण येऊन नये यासाठी सहा वर्षांपूर्वी १ कोटी २५ लाख रुपये खर्चून विद्युत पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडर तयार करण्यात आले होते. मात्र खोदकामादरम्यान याचे केबल तुटले तेव्हापासून हे फिडर बंदच आहे. त्यामुळे रुग्णालयात जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून यावरच सर्व धुरा आहे.
.....
दहा पदे रिक्तच
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील नवजात शिशू कक्षासाठी १० अतिरिक्त डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र ही पदे अद्यापही भरण्यात आलेली नाहीत. यामुळे बरेचदा समस्यासुध्दा निर्माण होते. या कक्षात दाखल बालकांवर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी तीन शिफ्टमध्ये परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली.
......
कोट :
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे व नवजात शिशूच्या कक्षाचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. नवजात शिशूच्या कक्षाच्या आतील भागात फायर इस्टिंगविशर नसून ते लावण्याचे निर्देश दिले आहे. तसेच या कक्षातील यंत्राचीसुध्दा नियिमित देखभाल दुरुस्ती केली जाते.
- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक