प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव
By Admin | Published: August 21, 2014 11:58 PM2014-08-21T23:58:02+5:302014-08-21T23:58:02+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार वैद्यकीय अधिकारी असावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र येथील कार्यभार केवळ एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे.
पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार वैद्यकीय अधिकारी असावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र येथील कार्यभार केवळ एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. येथे रूग्णांची संख्या वाढली असून एकाच अधिकाऱ्याला सर्वांना सेवा देणे मोठे जिकरीचे झाले आहे.
या आरोग्य केंद्रांतर्गत पांढरी, डुंडा, गोंगले, रेेंगेपार, मुरपार, घटेगाव, सितेपार, मालीजुंगा, बहीटोला, भोयरटोला आदी गावे येतात. या परिसरातून औषधोपचारकरिता रोज १०० ते १५० रूग्ण येतात. या मोठ्या आरोग्य केंद्रात चार वैद्यकीय अधिकारी असावे, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु येथे केवळ एकच वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळत आहे. त्यामुळे येथील रुग्णांना वारंवार तक्रारी कराव्या लागतात. येथील लोकप्रतिनिधींनी व जिल्हा परिषद सदस्यांनी या परिसरामध्ये चारपैकी किमान दोन तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती. परंतु अजूनपर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळालेले नाही. त्यामुळे कोसमतोंडी परिसरातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवावे लागत आहे.
डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. मात्र शासनाने अद्यापही वैद्यकीय अधिकारी सदर आयोग्य केंद्राला दिलेले नाही. याचा परिणाम येथील रूग्णांवर होत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच कमतरता जाणवते. त्यामुळे या परिसरासाठी आणखी एक वैद्यकीय अधिकारी तत्काळ नियुक्त करण्यात यावे अन्यथा येथील जनता आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)