वादळी पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

By admin | Published: May 30, 2017 12:57 AM2017-05-30T00:57:45+5:302017-05-30T00:57:45+5:30

जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली.

Lack of millions damaged in the rainy season | वादळी पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

वादळी पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात रविवार (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस आले. या वादळात अनेकांच्या घरांची छते उडून गेली. अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून वाहतूक प्रभावित झाली. धानपिकासह फळपिकांनाही फटका बसला. तर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना अख्खी रात्र अंधारातच काढावी लागली.
पान टपरीवर पडले झाड
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील दासगाव बु. येथील रहिवासी पृथ्वीराज बर्वे यांच्या पानटपरीवर जवळपास ५ फुटाच्या अंतरावर असलेला लिंबाचा झाड अचानक पडले. झाड पडल्यामुळे पानटपरीचा संपूर्ण सामान नष्ट झाला. उर्वरित काही न वाचल्याचे टपरी मालकाचे मोठे नुकसान झाले. सोमवार (दि.२९) रोजी स्थानिक तलाठ्याने पंचनामा करुन ६५ हजार ५०० रुपयांचा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. तसेच गोंदियाच्या सूर्याटोला येथील रहिवासी यशोदा यशवंत प्रधान यांच्या घरावरील छत वादळामुळे उडाले. आता त्या कुटुंबियांच्या डोक्यावर छत नाही. उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले की, गोंदिया तालुक्यात ११४ घरे व जनावरांचे ११ गोठे बाधित झाले आहेत. हा प्राथमिक अहवाल असून अधिकृत अहवाल मिळाल्यानंतर या संख्येत वाढ होऊ शकते.
दोन घरांचे छत उडाले
सडक-अर्जुनी : तालुक्यातील पांढरी येथील दोन घरांचे छत वादळामुळे उडाले. रविवारी सायंकाळी वाऱ्यासोबत पाऊस आले. पावसाचा तडाखा कोकणा-जमी, चिखली, पांढरी, कोसमतोंडी, डव्वा, खजरी, वडेगाव या परिसरात जास्त बसला.
गोरेगाव तालुक्यात १०.५८ लाखांचे नुकसान
गोरेगाव : तालुक्यात रविवारी आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. झाड पडून जनावरांचा मृत्यू तर घराची भिंत पडून नागरिकांवर जखमी होण्याची पाळी आली.
यात पलखेडा येथे झाड पडून एका गाईचा मृत्यू झाला. तर कटंगी येथे भिंत पडून दोन इसम जखमी झाले. त्यांना गोंदिया येथे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आंबेतलाव येथे १० घरे, गिधाडी येथे दोन घरे, तुमसर येथे एक घर, खोसेटोला येथे एक घर, हौसेटोला येथे एक घर, नवाटोला येथे एक घर, पलखेडा येथे एक घर, गणखैरा येथे दोन घरे, पिंडकेपार येथे सात घरे, तुमखेडा येथे नऊ घरे व दोन गोठे, बोटे येथे नऊ घरे, कटंगी येथे एक गोठा, गोरेगाव येथे दोन घरे व एक गोठा, चिचगाव येथे एक घर, चिचगावटोला येथे एक गोठा, गिरोला येथे एक गोठा शॉर्टसर्किटमुळे जळून खाक, बबई येथे दोन घरे, बाजारटोला येथे दोन घरे, मोहाडी येथे एक घर, मोहगाव येथे २० घरे, सर्वाटोला येथे सात घरे, धुंदाटोला येथे पाच घरे, दवडीपार येथे १५ घरे, शहारवाणी येथे सहा घरे, पिपरटोला-निंबा येथे एक घर व गोठा, हलबीटोला-निंबा येथे एक गोठा, तेढा येथे एक घर व निंबा येथे एक घर बाधित झाले.
यात एकूण १०५ घरे व सात गोठ्यांची पडझड झाली असून एका गाईचा मृत्यू तर दोन इसम जखमी झाले आहेत. यात अंदाजे नुकसान १० लाख ५८ हजार ७०० रूपयांचा झाला आहे.
वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी
अर्जुनी-मोरगाव : रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातले. आकाशात अचानक ढग दाटून आले. वाऱ्याची तीव्रता प्रचंड होती. सुमारे दीड तास वादळी वारा सुरुच होता. पावणे आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. फार काळ पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान टळले. धान कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान कापून शेतात ठेवले होते. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने नुकसान टळले. वादळी वाऱ्याच्या प्रचंड तीव्रतेमुळे आंबा गळून पडला. सायंकाळच्या सुमारास तयार झालेल्या हवामानामुळे उकाड्याने त्रास झालेल्यांना दिलासा मिळाला.
वादळी वाऱ्याचा फटका
सिरपूरबांध : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. परिसरातील लोक या वादळाचा उग्ररुप पाहून दहशतीत आले होते. या वादळामध्ये झाडे खाली कोसळली. यामध्ये आंबा पिकाला मोठे नुकसान झाले आहे. परिसरात सध्या उन्हाळी धानपीक असून वादळी पावसाचा फटका त्या पिकाला बसला आहे. त्याचप्रमाणे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यात अनेकांचे छत उडाले तर गोठेसुद्धा बाधित झाले आहेत.
वादळाने उडाले छत,
झाड पडून रहदारी बाधित
तिरोडा : रविवारी आलेल्या जोरदार वादळाने तुमसर-तिरोडा रस्त्यावर बाभळीचे झाड तिरोडा-बिर्सी फाटा या दरम्यान दोन ठिकाणी पडले. काही वेळ रहदारीस अडथडा निर्माण झाला. परंतु नागरिकांनी लवकरच रस्ता मोकळा केला.
तालुक्यातील सेलोटपार येथील सेवकराम टेकेउके यांच्या घराचे छप्पर उडाले असून तलाठ्यांच्या रिपोर्टवरुन १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सिल्ली येथील चांगो राजकुमार निलगाये व प्रविण राजकुमार निलगाये या दोन्ही भावांच्या घराचे छप्पर उडून १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मुरमाडी येथील चेतराम महादेव पारधी यांच्या घराचे छप्पर उडून आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
असा एकूण तिरोडा तालुक्यात तीस हजार रुपयांचा नुकसान झाल्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी सांगितले. तालुक्यात जीवित हानी कुठेही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात झाडे मात्र पडलीत. तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले.

Web Title: Lack of millions damaged in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.