कृषी विभागाचीे नियोजनशुन्यता आणि अधिकारी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:20+5:302021-05-22T04:27:20+5:30
सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी ...
सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविले जात असते. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमी ‘चलती का नाम गाडी’ ही म्हण सिद्ध करणारे ठरत असते.
दरवर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागताच खरीप हंगामाला सुरुवात होते. बळीराजा आपली बी पेरणीची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करतो. यंदा कोणत्या शेतात कोणते वाण टाकावे, किती टाकावे, सोबतच बाजारात कोणते नवीन वाण उपलब्ध आहे, त्याची शाश्वती किती, याचे नियोजन करतो. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्र लागताच शेतकरी धान बियाण्याच्या पेरणीला सुरुवात करतो. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. धानाची किंवा इतर पिकांची खरीप हंगामात उत्पादकता कशी वाढवता येईल, याबद्दल यथोचित मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कधीच वेळेवर मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऐनवेळी योग्य सल्ल्याअभावी आपल्या शेतीच्या नियोजनास मुकतो.
बॉक्स
कालबाह्य वाणाचे उशिरा अनुदान
बदलत्या काळानुसार शेतीतसुद्धा बदल आवश्यक झाला असून, उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित आणि संकरित धानाच्या वाणाचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. परंतु शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्या आणि कालबाह्य झालेल्या वाणासाठीच असते. तेही पेरणी झाल्यावर उपलब्ध केले जाते. परिणामी शासनाचे अनुदान नावापुरते ठरते. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.
कार्यालयात असतो नेहमी शुकशुकाट
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जेव्हा शेतकरी शासनाच्या काही योजना आहेत का, कोणत्या वेळी कोणते काम प्राधान्याने करावे व इतर बाबी विचारायला पोहोचतो तेव्हा-तेव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात, तर इतर सहायक कर्मचारीसुद्धा ठिकाणावर नसतात. नेहमी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट असतो. एक-दोन कर्मचारी असले तर ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मुळीच लक्ष न देता टालमटोल उत्तरे देत असतात. अशात या कार्यालयाचा उपयोग काय? असे मनात वाटते. सध्या लॉकडाऊन काळाचा अपवाद वगळला तरी वर्षभर कार्यालयात अनियमितता दिसून येते.